“महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ESIC चे रूग्णालय उभारणार”

114

राज्यातील प्रत्येक कामगारांना तसेच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ई.एस.आय.सी) किमान 30 बेडचे एक रूग्णालय उभारण्यात येणार असून या महामंडळाच्या दहा किलोमिटरपुढे एक रूग्णालय ही अट काढण्यात येणार असून आता लोकसंख्या तसेच आवश्यकतेनुसार रूग्णालय उभारण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री तथा कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले. कोविड काळात ई.एस.आय.सी.च्या रूग्णालयाने केलेल्या कामगिरीचे कौतुक करून राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या रूग्णालयांना प्राथम्याने सर्व सोयीसुविधा देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कोल्हापूर येथे लवकरात लवकर एक रूग्णालय उभारण्यात यावे, अशा सूचना कामगार मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

डॉक्टर्स, नर्सेसची तातडीने भरती करणार – राजेश टोपे

रूग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची संख्या कमी असल्याने ती तात्काळ भरण्यासाठी एम.पी.एस.सी. प्रमाणे किंवा थेट समुपदेश आणि मेरीट आधारित रिक्त पदावर भरती करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामगारांना योग्य सुविधा मिळाली नाही असे होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स तसेच नर्सेसची पदे भरण्यास यावी, त्याचप्रमाणे भरती प्रक्रियेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्यात यावी, असे निर्देश टोपे यांनी यावेळी दिले.

महामंडळाकडे दाव्यांची प्रतिपूर्ती तात्काळ आणि जलदगतीने व्हावी, यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तात्काळ भरती करण्यात यावी. दावा प्रतिपूर्तीमध्ये तामिळनाडू तसेच केरळ ही राज्ये पुढे असून त्यांनी अवलंबलेली पद्धत घेण्यात यावी. दावा प्रतिपूर्तीची प्रक्रिया 15 दिवसांच्या आत पूर्ण करावी, यासाठी एक निश्चित कार्यशैली तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या. कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रूग्णालये अधिक सक्षमपणे तसेच सर्व कामगारांना योग्य सुविधा मिळण्यासाठी पीपीपी तत्त्वाचा वापर करावा, आवश्यक वाटल्यास अन्य रूग्णालयांशी टाय-अप करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. चाकण (पुणे), तारापूर (पालघर) आणि पेण (रायगड) येथे ई.एस.आय.ची 3 रूग्णालये उभारण्यास तसेच बुटीबोरी येथील रूग्णालय 3 महिन्यामध्ये उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

(हेही वाचा – दादर येथे काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक)

कर्मचारी राज्य विमा महामंडळच्या महाराष्ट्र क्षेत्र प्रादेशिक बोर्डाची 112 वी बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ग्रामविकास व कामगार मंत्री तसेच ई.एस.आय.सी.चे अध्यक्ष हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा ई.एस.आय.सी.चे उपाध्यक्ष राजेश टोपे, केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. निलिमा केरकट्टा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल तसेच महामंडळावर नियुक्त सदस्य ऑनलाईन तसेच ऑफलाईन उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.