अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर सर्वाधिक फटका बसला तो भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना. त्यांच्याकडून पर्यटन आणि महिला बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्यात आली. आता ते केवळ कौशल्य विकास विभागाचे ‘कॅबिनेट’ मंत्री राहिले आहे. परंतु, दोन महत्त्वाची खाती काढून घेतल्यानंतरही लोढा यांचा ‘पर्यटन’ विभागाचा मोह सुटलेला नाही.
२ जुलैला झालेल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर १४ जुलै रोजी फेरबदलांसह खातेवाटप जाहीर करण्यात आले. त्यात मंगलप्रभात लोढा यांच्याकडील दोन महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली. महिला आणि बालविकास विभाग राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना देण्यात आला. हे खाते काढले जाईल, याची कल्पना लोढा यांना आधीपासूनच होती. मात्र, पर्यटन विभाग काढून घेतल्याने त्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे हे खाते काढून भाजपाच्याच गिरीश महाजन यांना देण्यात आले.
(हेही वाचा No Confidence Motion : श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; UPA काळातील भ्रष्टाचारांची वाचून दाखवली यादी )
खातेबदलात महाजनांकडचेही वैद्यकीय शिक्षण खाते गेले असले, तरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला ग्रामविकास हा महत्त्वाचा विभाग त्यांच्याकडे आहे. त्यामुळे लोढांकडे उरलेले पर्यटन हे एकमेव महत्त्वाचे खाते त्यांना देण्याची तशी गरज नव्हती. परंतु, सनदी अधिकाऱ्यांकडून तक्रारी वाढत गेल्याने लोढा यांना फक्त कौशल्य विकासापुरते मर्यादीत ठेवण्यात आले आहे. तरीसुद्धा त्यांचा ‘पर्यटन’ विभागाचा मोह सुटलेला नाही. आजही त्यांच्या नावापुढे पर्यटन मंत्री असा उल्लेख केला जात आहे.
नावापुढे पर्यटन मंत्रीपदाचा उल्लेख
टिळक नगर चेंबूर येथे विविध विकासकामांसाठी लोढा यांनी जिल्हा नियोजन निधीमार्फत १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नुकताच या कामांचा शुभारंभ झाला. यावेळी एका कोनशीलेचे अनावरण मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. ६ ऑगस्ट २०२३ रोजी तयार केलेल्या या कोनशीलेवर लोढा यांचा पर्यटन आणि कौशल्यविकास असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे १४ जुलैला पर्यटन खाते काढू घेतल्यानंतरही लोढा सर्रासपणे या खात्याची शेखी मिरवत आहेत, अशी टीका केली जात आहे.
Join Our WhatsApp Community