पीएसआयच्या भरतीत अवघ्या तीनच जागा धनगर समाजाला दिल्याने विद्यार्थ्यांनी एमपीएससी आयोगाच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे एमपीएससी आयोगामार्फत राज्यातील भरल्या जाणाऱ्या जागांमध्ये बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाला ३.५ टक्के आरक्षित जागा द्या. बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा दिल्या नाहीत, तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करू, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला होता. यावर एमपीएससी आयोगाने एक परिपत्रक काढले. विविध विभागातील पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारित येत नाही. तर हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित येतो, असे एमपीएससी आयोगाने स्पष्ट केले.
काय म्हटलेय एमपीएससी आयोगाने?
विविध विभागातील पदसंख्या आणि आरक्षित जागा हा विषय आयोगाच्या अखत्यारीत येत नाही. राज्य शासनाच्या अखत्यारीत हा विषय येतो. शासनाने दिलेल्या मागणीपत्रानुसार आम्ही भरती करतो. आरक्षित जागांचा विषय आमच्याकडे येत नाही, असे एमपीएससी आयोगाने एका परिपत्रकातून म्हटले. तर एमपीएससीच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, महाराष्ट्र लोकसेवा अभियांत्रिकी सेवा २०२० आणि राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० या तिन्ही पूर्व परीक्षांचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागणार आहे, अशी माहिती एमपीएससी आयोगाने दिली आहे.
(हेही वाचा : बैलगाडा शर्यत : पोलिसांनी मैदान खोदले, पडळकर विरुद्ध पोलिस प्रशासन सामना रंगणार!)
बिंदू नामावलीनुसार धनगर समाजाच्या जागा भरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रशासनावर वचक नाही. मुख्यमंत्री निकामी आणि प्रशासनही निकामी आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि समाज कल्याण विभागाचे मंत्री झोपा काढत आहेत का? असा खोचक सवालही गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. बिंदू नामावलीनुसारचे धनगर समाजाच्या जागा भरा, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही पडळकर यांनी दिला.
Join Our WhatsApp Community