सुहास शेलार
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ३८ पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीत अल्पावधीतच बिघाडीचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस आणि आम आदमी पक्षात मतभेद उफाळून आल्यानंतर, आता महाराष्ट्रातही काँग्रेस आणि ठाकरे गट विरुद्ध राष्ट्रवादीत (शरद पवार गट) संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. शरद पवार यांची अजित पवार आणि भाजपासंदर्भातील भूमिका अद्यापही स्पष्ट होत नसल्याने राष्ट्रवादीविना लढण्याची चाचपणी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून केली जात आहे. त्यामुळे मोदींना हॅट्रिकपासून लांब ठेवण्यासाठी फिल्डिंग लावत असलेले ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष स्वतःच विकेट देऊन बसतात की काय, अशी शंका वर्तवली जात आहे.
शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मागच्या शनिवारी उद्योजक अतुल चोरडिया यांच्या पुण्यातील निवासस्थानी गुप्त बैठक पार पडली. ठाकरे गट वा काँग्रेसला ही भेट अपेक्षित नसल्यामुळे त्यांच्यासाठी तो मोठा धक्का होता. वृत्तवाहिन्यांवर त्याबाबतच्या बातम्या प्रसारित होताच हडबडलेल्या काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पाठवून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ठाकरेही पवारांच्या खेळीविषयी अनभिज्ञ होते. पवारांच्या कोड्यात टाकणाऱ्या भूमिकेमुळे भविष्यात मतदार दुरावू शकतात, शिवाय आयत्यावेळी दगाफटका होण्याची भीती दोन्ही बाजूंनी व्यक्त झाल्यामुळे राष्ट्रवादीविना लढण्याची चाचपणी करण्याचे ठाकरे-पटोले भेटीत ठरले. त्याला हायकमांडचाही होकार मिळाल्यामुळे मतदार सर्वेक्षण करणाऱ्या एका खासगी कंपनीला नियुक्त करून अहवाल तयार करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.
(हेही वाचा – ग्रामीण भागात शिकलेली, इंग्रजी नीट येत नसलेली सुरभी जिद्दीने बनली IAS)
आपल्या अपरोक्ष महाविकास आघाडीत सुरू असलेल्या कारनाम्यांची माहिती मिळणार नाही, ते पवार कसले? पवारांनी आपली सूत्रे कामाला लावत मातोश्रीवरील गुप्त खलबतांची माहिती घेतली. हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करीत असतील, तर राष्ट्रवादीची भूमिका काय असावी, याविषयी त्यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांशी चर्चा केली. त्यानंतर बंडखोरांच्या मतदारसंघांसह पवार गटाला अनुकूल असलेल्या (ठाकरे गट आणि काँग्रेसकडील) मतदारसंघांत दौरा करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार, येत्या काळात ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्येही पवारांची तोफ धडकताना दिसणार आहे.
हायकमांडच्या डोक्याला आठ्या
शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील गुप्त बैठकीची माहिती राहुल गांधींनी नाना पटोले यांच्याकडून घेतली. मुंबईत होणाऱ्या इंडियाच्या बैठकीत ते यासंदर्भात पवारांशी चर्चा करणार आहेत. नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. परंतु, देशातील सर्वात अनुभवी राजकारणी असलेल्या पवारांना राहुल गांधींनी जाब विचारणे राष्ट्रवादीला पटलेले नाही. त्यामुळे त्यांनीही काँग्रेसविषयी असलेली मित्रत्वाची भावना बाजूला ठेवून राज्यातील नेत्यांच्या करामती या ना त्या कारणावरून हायकमांडच्या कानी घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे हायकमांडच्या डोक्यालाही आठ्या आल्या आहेत.
शरद पवारांच्या भूमिकेबाबत मविआत संभ्रम
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतरही शरद पवार गटाने अजित पवार आणि इतर आमदारांविरोधात याचिका दाखल केलेली नाही. विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्षांकडे कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात आलेला नाही. किंबहुना अजित पवार आणि गटाविरोधात ठोस भूमिका घेतलेली नाही. पावसाळी अधिवेशनात लोकसभेत किंवा राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांवेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर बडगा उगारला नाही. याउलट अजित पवार किंवा त्या गटाच्या नेत्यांसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संवादमालिका सुरू आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबाबत महाविकास आघाडीत संभ्रम आहे.
‘आप’ इंडियाच्या बैठकीला येणार नाही
राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्यामुळे आम आदमी पक्षासोबत त्यांचे मतभेद उफाळून येऊ लागले आहेत. त्याचा परिणाम ‘इंडिया’ आघाडीवर होणार आहे. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. दिल्लीतील लोकसभेच्या जागांवरून काँग्रेसशी बिनसल्याने आम आदमी पक्षाने या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
‘जोड’ एकसंध कसा राहील ?
शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यामध्ये गुप्त बैठक पार पडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने प्रतिक्रिया देत, भाजपाने शरद पवारांना केंद्रात मंत्रिपद आणि निती आयोगाच्या अध्यपदाची ऑफर दिल्याचे जाहीर करून टाकले. पवारांनी माध्यमांसमोर त्यांना प्रत्युत्तर दिले नसले, तरी काँग्रेस हायकमांडसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणतीही शाहनिशा न करता काँग्रेसचे नेते अशाप्रकारे प्रतिक्रिया देत असतील, तर आम्हालाही जाहीर उत्तर द्यावे लागेल, अशी ताकीद त्यांनी दिली. त्यामुळे हायकमांडकडून चव्हाणांना सबुरीचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर चव्हाण यांनी भूमिकेत बदल करीत, राष्ट्रवादीविषयी सगळे संभ्रम दूर झाल्याचे स्पष्ट केले.
हा घोळ निस्तरत असतानाच आता विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांविषयी प्रतिक्रिया देऊन हायकमांडच्या डोक्याचा ताप वाढवला आहे. शरद पवार सोबत आले, तरच तुम्हाला मुख्यमंत्री करू, अशी अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना घातली आहे. त्यामुळेच अजित पवार शरद पवार यांची वारंवार भेट घेत असावेत, असे वडेट्टीवार म्हणाले. हे विधान शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे आहे, असा आक्षेप घेऊन राष्ट्रवादी पुन्हा हायकडांकडे गेली आहे. परिणामी, काँग्रेस-राष्ट्रवादीत वारंवार खटके उडत असल्यामुळे भविष्यात त्यांचा ‘जोड’ एकसंध कसा राहील, याविषयी वरिष्ठ नेत्यांना शंका वाटत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community