काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्वबळावर काय म्हणाले प्रवीण दरेकर? वाचा…

शेतकरी, कामगार यांच्या बाहुंमध्ये बळ उरले नाही, पण महाविकास आघाडीतील पक्षांना स्वबळाचे पडले आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

97

कॉंग्रेसच्या नेत्यांना स्वबळाचे पडले आहे. पण महाविकास आघाडी सरकारमध्ये महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हातात ताकद राहिलेली नाही, सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्या बाहुत बळ राहिले नाही. आज राज्यातील कामगार देशोधडीला लागलाय. त्या कामगारांच्या हातात बळ राहिलेले नाही. पण अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षांना फक्त स्वबळाची काळजी आहे. परंतु जर अश्याच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसाल, तर बळ बळ करता करता ही जनताच यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही, असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथील शिवक्रांती कामगार संघटनेच्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी चिटणीस रमेश पाळेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच विविध वेतनवाढ करार स्वाक्षरी कार्यक्रम दरेकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, विजय पाळेकर, बिंदरा गणतंत्रा, अॅड. राहुल पोळ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा : म्हणून आम्ही स्वबळाची तयारी करतोय…अखेर नानांनी सांगितले कारण)

राज्यातील शेतकरी, बेरोजगार युवक हतबल! 

कॉंग्रे़सचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळा येथील याच ठिकाणावरून स्वबळाचा नारा दिला होता. त्यानंतर पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य केले व महाविकास आघाडीतील अविश्वासाचे वातावरण व विसंवाद जनतेसमोर उघड झाला. महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही. शेतक-यांना वेळेत पीकविमा मिळात नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला, बेरोजगार युवक कामाच्या प्रतीक्षेत आहे. तो युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. तुमच्या स्वबळाचं राज्यातील कामगार, शेतकरी, बेरोजगार यांना काही देणं-घेणं नाही. फक्त आमच्या हातात बळ कधी येणार? आमचं कुटुंब, आमचा संसार कधी बळकट होणार? याकडे महाराष्ट्राची जनता आशेने बघत आहे. पण या महाविकास आघाडी सरकारला त्याचं काही पडलेलं नाही, अशी टिका दरेकर यांनी केली.

आधी एकमेकांना शिव्या घालतात नंतर एकत्र नांदतात!

राज्यातील कोट्यवधी जनतेचा विकास करण्यापेक्षा महाविकास आघाडीमधील सत्ताधारी पक्षांना सत्ता टिकविण्याची चिंता जास्त आहे. सत्ता कशी टिकून राहिल याची काळजी त्यांना जास्त आहे. आधी एकमेकांना शिव्या घालायच्या व दुस-या दिवशी पुन्हा एकत्र नांदायचे हे सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांचे समीकरण झाले आहे, असेही दरकेर यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.