मुंबईत एकेकाळी बटाटे विकणारा फारुख बटाटा आज मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर बनला आहे. फारुख बटाटा याच्या संपर्कात बॉलिवूडच नाही तर गुन्हेगारी जगतातील मोठमोठे गुंड असल्याची धक्कादायक माहिती एनसीबीच्या चौकशीत समोर आली आहे. एनसीबीने गुरुवारी रात्री फारुख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा उर्फ शादाब शेख आणि शाहरुख खान उर्फ शाहरुख बुलेट या दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे बॉलिवूड, पब आणि खाजगी पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा पुरवठा करत होते, अशी माहिती समोर येत आहे.
मुद्देमालासह अटक
नारकॉटिक्स कंट्रोल ब्युरो(एनसीबी)चे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या पथकासह मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी, ओशिवरा, लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड या ठिकाणी गुरुवारी रात्री छापेमारी केली होती. या छापेमारीत एनसीबीच्या हाती फारुख बटाटा याचा मुलगा शादाब शेख उर्फ शादाब बटाटा आणि शाहरुख खान उर्फ शाहरुख बुलेट हे दोघे लागले. या छापेमारीत एनसीबीने २ किलो एमडी, १६० ग्राम इफेड्रीन १ लाख १५ हजारांची रोकड, मोठ्या प्रमाणत विविध देशांचे चलन, नोटा मोजण्याचे मशीन आणि दोन महागड्या मोटारी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
(हेही वाचाः मनसुख हिरेन यांच्या तोंडावरचे रुमाल गेले कुठे? शेलारांचा सवाल!)
हाय प्रोफाइल लोकांचा सहभाग
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान ऊर्फ शाहरुख बुलेट याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच शादाब बटाटा हा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा असून तो पश्चिम उपनगरातील मोठा ड्रग्स सप्लायर आहे. बॉलिवूड, पब आणि खाजगी पार्टीमध्ये शादाब हा मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा पुरवठा करतो व त्याच्या संर्पकात बॉलिवूडशी संबंधित बड्या व्यक्ती, उद्योगपती आणि त्यांची मुले असल्याची माहिती समोर येत आहे. २०१८ मध्ये ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थच्या गुन्हयात शादाबला अटक केली होती, त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता.
बटाटा व्यापारी झाला ड्रग डिलर
शादाबचे वडील फारुख बटाटा हे नव्वदीच्या दशकात मुंबईत बटाटा विकायचे. बटाटा विक्रीचा ठोस व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याला फारुख बटाटा या नावाने ओळखले जायचे. बटाटा विक्री करता करता फारुख हा बड्या ड्रग्स डीलर आणि अंडरवर्ल्डच्या संपर्कात आला आणि त्याने तेथून ड्रग्सच्या धंद्यात पाऊल टाकले होते. फारुख हा आता मुंबईतील बडा ड्रग्स डीलर म्हणून ओळखला जातो. सुशांत सिंग प्रकरणात देखील त्याचे नाव आले होते. तेव्हापासून फारुख हा फरार असून त्याचा व्यवसाय त्याचा मुलगा शादाब हा सांभाळत होता.