अमरावती जिल्ह्यातील गुगामल राष्ट्रीय उद्यानात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या, हरीसाल येथील परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी दिपाली यांनी सुसाईट नोट लिहीत आपल्या वरिष्ठ अधिका-यांवर गंभीर आरोप केले आहेत.
वरिष्ठांवर गंभीर आरोप
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे जिल्हा वन अधिकारी विनोद शिवकुमार यांनी दिपाली यांचा मानसिक छळ केला असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोटमधून स्पष्ट होत आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रमुख संरक्षक रेड्डी यांच्या नावे चिठ्ठी लिहीत आपल्याला विनोद शिवकुमार यांनी कशाप्रकारे त्रास दिला, याचा उल्लेख त्यांनी केला आहे. विनोद शिवकुमार आपल्याला वारंवार कुठल्याही गोष्टीची खात्री न करता निलंबित करण्याची धमकी देत असत. तसेच आपल्याला गावकरी व कर्मचा-यांसमोर अश्लील शिवीगाळ करत असल्याने आपल्याला फार मोठा मानसिक त्रास झाल्याचे, त्यांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचाः भांडुपच्या आगीत सनराइज रुग्णालयतील नऊ जणांचा होरपळून मृत्यू!)
शिवरामला अटक
आपण गर्भवती असताना आपल्याला सलग तीन दिवस कच्च्या रस्त्यावरुन चालवले व त्यामुळे आपला गर्भपात झाला असंही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान दिपाली यांनी आरोप केलेल्या विनोद शिवकुमारला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. नागपूर-बंगळूर राजधानी एक्स्प्रेसमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना अमरावती गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करत त्याला अटक केली आहे. दिपाली चव्हाण यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवराम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी होती कामगिरी
रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्य प्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींच्या मुसक्या आवळत आपली कामगिरी चोख बजावली होती. यामुळेच लेडी सिंघम म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती. त्यांनी आपल्या कामगिरीने अनेकांना सळो की पळो करुन सोडले होते. पण गेल्या अनेक दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी विनोद शिवराम यांच्याकडून त्यांना मानसिक त्रास होत असल्याने त्या खूप त्रस्त झाल्या होत्या.
(हेही वाचाः राज्यात कोरोनाचे संकट वाढले, पुण्यात ऑक्सीजन बेडची कमतरता!)
कुटुंबियांनी केली शिक्षेची मागणी
दिपाली यांच्या घरच्यांनी विनोद शिवराम यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. गेले अनेक दिवस शिवराम दिपाली कार्यरत असलेल्या हरिसाल क्षेत्रात येत असून त्यांचा मानसिक छळ त्यांनी केला, असे दिपाली यांच्या कुटुंबियांनी सांगितले. मला खूप मानसिक त्रास होत आहे. मला जगायची इच्छा नाही. असा फोन दिपाली यांनी घरच्यांना केला असल्याचे दिपाली यांच्या कुटुंबियांनी सांगितले. तसेच वारंवार अपर प्रमुख संरक्षक रेड्डी यांच्याकडे तक्रार करुन सुद्धा त्यांच्याकडून शिवराम यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community