एमआयडीसीच्या धर्तीवर ‘एफआयडीसी’ सुरू होणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

149

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौर, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, विभागीय व्यवस्थापक ए. आर. प्रवीण, नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा उपस्थित होते.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनी ‘शोध हा नवा – शतजन्म शोधिताना’)

एफडीसीएम केवळ वन क्षेत्राच्या विकासासाठीच काम करीत नाही तर वन विभागातील कर्मचाऱ्यांना एखाद्या कुटुंबाप्रमाणे मानत त्यांच्याही सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करीत आहे. एफडीसीएम केवळ एक महामंडळ नसून एखाद्या कुटुंबासारखे आहे. वन विकास महामंडळातील  खेळाडूंनी सर्वच स्पर्धांमध्ये यश मिळावावे. वन विकास महामंडळातील खेळाडूंचे कौतुक यासाठी करावे लागेल की विदर्भातील उष्णतामान जास्त असतानाही ते मैदानी खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करीत आहेत. एफडीसीएमच्या खेळाडूंचा चपळता व कार्यकर्तृत्वाच्या  बाबतीत चित्ता असा उल्लेख करीत मुनगंटीवार यांनी उपस्थित खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

राज्यातील वनक्षेत्रात मोठी  वाढ

महाराष्ट्रातील वन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. नुकत्यात आलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. २ हजार ५५० वर्ग किलोमीटरचे वनक्षेत्र महाराष्ट्रात वाढले आहे. मँग्रेाजमध्येही १०२ वर्ग किलोमीटरची वाढ झाली आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मँग्रोजची संकल्पना देशभरात राबविण्याची घोषणा केली, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गौरवाने नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.