राज्याच्या राजकारणात सध्या दोन दादांमधील वाद चर्चेचा विषय ठरत असून, हे दोन दादा आता एकमेकांना भिडले आहेत. आता तुम्ही म्हणाल हे दोन दादा आहेत तरी कोण? अहो यातले एक दादा म्हणजे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा, तर दुसरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा… अजित दादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, तर चंद्रकांत दादा हे पुण्याचे आमदार. मात्र पुण्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या यावरुन या दोन्ही दादांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. चंद्रकांत दादांनी आरोप केल्यानंतर अजित दादांनी देखील त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.
अजित दादांची चंद्रकांत पाटलांवर टीका
अजित पवारांनी झोप कमी करावी, झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडावं, असा सल्ला देणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदर प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार जनतेच्या प्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत.
अशी टीका अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती. भाजप प्रदेशाध्यक्षांनी माझ्यावर नेटवर्कबाहेर असल्याचा आरोप करण्यापूर्वी, त्यांच्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी मला भेटले होते. किती मंत्री, अधिकारी, लोकप्रतिनिधींशी मी संपर्क साधून चर्चा केली, याची माहिती घेतली असती, तर असे खोटे आरोप करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.
दादांना पुन्हा चंद्रकांत पाटलांनी डिवचले
अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा डिवचले आहे. अजितदादांवर कामाचा ताण आहे, त्यामुळे त्यांनी एकतर राज्य पुण्यातून चालवावं किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना पुन्हा डिवचले आहे.
अजितदादांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही. ते सक्षम आहेत. मी त्यांचं नेहमीच कौतुक केलं आहे. ते सकाळी 7 वाजताच मंत्रालयात जातात. बाकीच्या मंत्र्यांचा दिवस 11 वाजता सुरू होतो. हे मंत्री 11 वाजेपर्यंत फोनही उचलत नाहीत. अजितदादांवर कामाचा लोड आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातून राज्य चालवावे किंवा पुण्याला नवा पालकमंत्री द्यावा. त्यांनी पुण्यातून राज्य चालवल्यास ते लोकांना सहज उपलब्ध होतील. लोकांच्या समस्या अधिक वेगाने आणि लवकर सुटतील.
असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
निलेश राणे यांचाही अजित पवारांवर प्रहार
माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपाचे आमदार येतात ते पाहा. पवार साहेब, ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करून बोलले पाहिजे, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community