विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की! काय आहे कारण?

ही धक्काबुक्की फडणवीस यांनी हस्तक्षेप करुन सोडवल्याचीही माहिती मिळत आहे.

राज्यातलं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन ख-या अर्थाने वादळी ठरत आहे. सकाळपासूनच सरकारच्या विरोधात भाजप आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. सभागृहातही भाजपच्या आमदारांनी सरकारविरोधात हल्लाबोल केला. आता भाजप आमदार संजय कुटे आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यात धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळत आहे.

10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले, त्यावेळी विधान भवनातील अध्यक्षांच्या दालनात ही धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः वांझोट्या सरकारचं वांझोटं अधिवेशन)

काय झाले नेमके?

विधानसभा अध्यक्षपदी तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव विराजमान झाले होते. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरक्षणावरुन मांडलेल्या मुद्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा मांडण्याची संधी मागितली. पण तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ती संधी नाकारल्यामुळे भाजप आमदार आक्रमक झाले. तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न भाजप आमदांरानी केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले.

(हेही वाचाः सरकारने लोकशाहीला कुलूप लावले! देवेंद्र फडणवीस आक्रमक)

सभागृह तहकूब केल्यानंतर भाजप आमदार विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले नाही, म्हणून अध्यक्षांच्या दालनात जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी ही धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळत आहे. ही धक्काबुक्की फडणवीस यांनी हस्तक्षेप करुन सोडवल्याचेही समजत आहे.

कारवाई करण्याची मागणी

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी या घटनेवरुन कारवाईची मागणी सभागृहात केली. तालिका अध्यक्षांसोबत हमरातुमरी भाजप आमदारांनी केली, त्यांच्या अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली तरच हे सभागृह चालेल, असे भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितले. ज्याप्रकारे विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला आणि सभागृह तहकुबीनंतर अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना मारण्याचा, त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला, हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे याबाबतीत निर्णय घेऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

(हेही वाचाः एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार! अजित पवारांची घोषणा)

काय म्हणाले फडणवीस?

याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही धक्काबुक्की झाली नसल्याचे सांगितले आहे. सत्ताधा-यांना हे अधिवेशन सुरळीतपणे चालू द्यायचे नसल्यामुळे ते अशाप्रकारच्या कहाण्या रचत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here