रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना ‘टोचले’!

नवाब मलिक यांनी रेमडेसिवीअर वरुन भाजपवर केलेल्या आरोपाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही वाढत चालला आहे. पण असं सगळं असताना राज्यातील राजकारणही तापत आहे. महाराष्ट्राला लसींचा अपुरा पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगत राज्य सरकारने केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. पण आता रेमडेसिवीर इंजेक्शन वरुनही भाजप आणि महाविकास आघाडीत खडाजंगी सुरू झाली आहे. नवाब मलिक यांनी रेमडेसिवीअर वरुन भाजपवर केलेल्या आरोपाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?

लसींचा पुरवठा करण्यात केंद्राकडून गुजरातला झुकतं माप देण्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला. पण रेमडिसीवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुनही राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशात सर्वत्र रेमडेसिवीरचा तुटवडा असताना सुरतमधील भाजप कार्यालयातून मोफत रेमडेसिवीरचे वाटप केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सुरतमध्ये भाजप कार्यालयात हा रेमडेसिवीरचा साठा आला कोठून, असा सवाल त्यांनी केला आहे. प्रशासकीय यंत्रणेला डावलून जर अशाप्रकारे राजकीय पक्ष कार्यालयातून रेमडेसिवीरचा पुरवठा केला जात असेल, तर हे राजकारण नाही का, यापेक्षा कुठला पुरावा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना हवा आहे, असा प्रश्न नवाब मलिक यांनी केला आहे.

(हेही वाचाः लसीकरणात महाराष्ट्र झाला ‘कोट्याधीश’! कशी आहे लसीकरणाची आकडेवारी?)

दरेकरांचा पलटवार

नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मलिक यांचे हे विधान अर्थहीन असल्याचे सांगितले. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राज्यातील जनतेची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्रात तसे होताना दिसत नाही. केवळ माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं म्हणून चालणार नाही, तर त्यासाठी जबाबदारीने वागण्याची गरज आहे. दुस-याच्या ताटात काय वाढलं आहे, हे बघण्यापेक्षा आपले ताट रिकामे आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अधिक शक्तीशाली कशी होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज राज्यात ऑक्सिजन बेडची टंचाई आहे. त्याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्र सरकार, नरेंद्र मोदी, देवेंद्रजी यांच्यावर आरोप करण्यापेक्षा राज्यात आरोग्य व्यवस्थेच्या नियाजनावर सत्ताधा-यांनी वेळ घालवावा, अशी खोचक विनंती त्यांनी केली आहे.

(हेही वाचाः भाजपचा ‘घर-घर झेंडा’! राज्यात कमळ पुन्हा ‘खुलणार’?)

अतुल भातखळकर यांचा आरोप

पिंपरी-चिंचवडच्या कोविड सेंटरमधूनच रेमडेसिवीर चा काळा बाजार सुरू होता, असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. सत्ताधारीच पोलिसांकरवी खंडणी वसूल करत असतील तर, औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना कोण थांबणार आहे? अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच भाजप कार्यालयात रेमडिसिवीरचे मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला आहे. दुसरा काही चांगले कार्य करत असेल तर त्याचे कौतुक करा, असा सल्लाही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

रेमडेसिवीरबाबत काय म्हणाले टोपे?

रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत बैठक घेणार आहे. आमच्या गरजेप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन दिले पाहिजे आणि त्याची किंमत 1200 रुपये झाली पाहिजे. काही खासगी दवाखाने रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज नसताना वापरतात. त्यांना सध्या महामारीचे दिवस आहेत नफेखोरीचे नाहीत, असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले. महाराष्ट्रासाठी 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या टीम आलेल्या आहेत. त्या लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन याची माहिती घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि शरद पवार रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कंपन्यांशी बोलत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. असेही टोपे यांनी सांगितले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here