टिपू सुलतानवरुन शिवसेना-भाजपात तलवारबाजी सुरू

देवनार येथील उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मुद्द्याला भाजपने तीव्र विराध केल्यानंतर, शिवसेनेने प्रत्युत्तरादाखल गोवंडीतील शिवाजी नगर येथील रस्त्याला शहिद टिपू सुलतान यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला भाजपनेच पाठिंबा दिला असल्याचे सांगत, भाजपचे हे राजकारण असल्याचा आरोप केला. यावर भाजपचे आमदार अमित साटम यांनी शिवसेनेची सोनिया सेना झालेली असून, आपण कधीही स्थापत्य उपनगरे समितीत नव्हतो. त्यामुळे येत्या सात दिवसांमध्ये आपली चूक महाराष्ट्रासमोर आणा, अन्यथा आपल्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला जाईल, असे इशारावजा आव्हान दिले.

भाजपचा आताच विरोध का?

समाजवादी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी देवनार येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. यावरुन भाजप विरुध्द शिवसेना असे राजकारण रंगलेले असतानाच, महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाजार व उद्यान समितीचा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्यामागे त्याची तपशीलवार माहिती मिळावी, हेच कारण असल्याचे सांगितले. पण २०१३ मध्ये एम-पूर्व विभागातील बाजीप्रभू मार्गापासून रफिक नगरपर्यंतच्या शिवाजी नगरमधील रस्त्याला टिपू सुलतान असे नाव देण्याचा ठराव स्थापत्य उपनगरे समिती व महापालिकेत करण्यात आला. त्यावेळी आम्ही आणि भाजप सत्तेत होतो, तेव्हा त्यांचा विरोध नव्हता. मग आता विरोध का? कोण कोणाला पाठिंबा देतो यापेक्षा नियमात बसते का, हेही पहायचे आहे. ते सोयीनुसार राजकारण करत असून आम्ही कधीही हिंदुत्व सोडलेले नाही, असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

(हेही वाचाः उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजपने उपसल्या विरोधाच्या तलवारी! शिवसेनेचा मात्र छुपा पाठिंबा)

भाजपचे आव्हान

महापौरांनी नामकरणाचा जो ठराव २०१३ रोजी केला होता, त्याची कागदपत्रे दाखवली. त्यात महापालिकेत झालेल्या ठरावामध्ये शिवसेना नगरसेवक शैलेश फणसे हे सूचक तर भाजपचे तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांचे अनुमोदक म्हणून नाव दिले आहे. त्याचा समाचार अमित साटम यांनी घेतला. मुंबईची तुंबई करणाऱ्या आणि टिपू सुलतानचे नाव रस्त्याला देण्याच्या नामकरणाच्या मुद्द्यावर खोटे बोलणाऱ्या महापौरांचा आमदार अमित साटम यांनी निषेध व्यक्त केला. आपली सुलतानवरील श्रध्दा झाकण्यासाठी हिंदुहृदयसम्राटांच्या नावाचा आधार आपण घेतच आहात. माझेही नाव बनावट कागदपत्राच्या आधारे दाखवून आपले खोटे बोलणे रेटत आहात. त्यांची सोनिया सेना झाली आहे, अशा शब्दांत साटम यांनी महापौरांचा समाचार घेतला. नगरसेवक असताना स्थापत्य उपनगरे समितीचा कधीही सदस्य नव्हतो. त्यामुळे जर टिपू सुलतानचे नाव रस्त्याला देण्यासाठी माझे जर अनुमोदन असेल, तर सात दिवसांमध्ये ते महाराष्ट्रासमोर आणावे. अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड देण्यासाठी तयार राहावे. आपण जर ते पत्र सादर केले नाही तर आपल्याविरोधात रितसर तक्रार करुन, आपल्याविरोधात ५० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा केला जाईल, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

(हेही वाचाः आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशाने मनविसेचे ग्रहण सुटले)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here