युवक काँग्रेसमधील अंतर्गत वादाचे पर्यवसन शनिवारी, १७ जून रोजी हाणामारीत झाले. काही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने खुर्च्या भिरकावत विद्यमान अध्यक्षांविरोधात रोष व्यक्त केला.
दादरच्या टिळक भवनातील काँग्रेस कार्यालयात शनिवारी युवक काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीदरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी व्यासपीठाच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या. युवक काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध करीत आक्रमक पवित्रा घेतला.
कुणाल राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत त्यांना बदलण्याची मागणी या गटाने केली. त्यानंतर बैठकीत काही कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातील काहींनी व्यासपीठाच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी राऊत यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. यामुळे वाद आणखी चिघळला. मात्र, वरिष्ठांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांत झाले. आगामी निवडणुकांच्या तोंडावर युवक काँग्रेसमध्ये अशाप्रकारे वाद उफाळून आल्यामुळे तो शमवण्याचे आव्हान प्रदेश नेतृत्त्वासमोर उभे राहिले. दरम्यान, या वादानंतर हायकमांडकडून युवक अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेते का, हे पाहणे औत्सुक्य ठरेल.
Join Our WhatsApp Community