Amravati Graduate Constituency: ऐन निवडणुकीच्या धामधुमीत रवी राणांमुळे भाजप उमेदवार अडचणीत

148

राज्यातील बहुचर्चित पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सोमवारी, ३० जानेवारी सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. यादरम्यान अमरावती पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुसाठीचा प्रचार शनिवार, २८ जानेवारी रोजी संपला होता. तरीदेखील पाटील यांच्या समर्थनार्थ आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने रविवारी, २९ जानेवारीला मेळावा आयोजित केला होता. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार रणजित पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने रणजित पाटीलांच्या समर्थनार्थ रविवारी महेश भवन येथे मेळावा आयोजित केला होता. या ठिकाणी सकाळी ११ वाजता भाषण सुरू होते. ही बाब आचारसंहिता उल्लंघन प्रतिबंधक पथकाच्या लक्षात आली आणि त्यांनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रवी राणा यांच्या या मेळाव्यामुळे रणजीत पाटील अडचणीत आले आहेत.

दरम्यान अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. भाजपचे रणजित पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकार, भाजपाचे बंडखोर उमेदवार शरद झांबरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यासह २३ उमेदवार या मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

(हेही वाचा – शरद पवार लव्ह जिहादवर का बोलत नाहीत?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.