नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत बुधवारी अंतिम निर्णय – अजित पवार

162
कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे, त्यामुळे यावर बुधवारी, १८ जानेवारी रोजी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

कॉंग्रेसमुळे पेच निर्माण झाला

कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे, तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे, हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील, असेही अजित पवार म्हणाले.

भाजपला संधी मिळाली आहे म्हणून बोलत आहेत

तीन टर्म आमदार असल्याने या जागा वाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनद्वारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना कॉंग्रेसच्या वरीष्ठांना दिली होती, असेही अजित पवार यांनी सांगितले. या जागा वाटपावर भाजप बोलत आहे. भाजपला संधी मिळाली आहे म्हणून बोलत आहेत मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता; मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हा कॉंग्रेसचा अंतर्गत प्रश्न

हा कॉंग्रेस अंतर्गत प्रश्न आहे, त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता त्याचा मी साक्षीदार आहे असे सांगतानाच महाविकास आघाडीत समन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.