राज्यातील 14 महापालिका तसेच अनेक जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कोरोना काळामुळे प्रलंबित आहेत. या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. याचबाबत आता सर्वोच्च न्यायालयात 17 मे रोजी निर्णय होणार आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार, हा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे बोलले जात आहे.
17 मे रोजी होणार सुनावणी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या निवडणूक आयोगाला दिले होते. पण निवडणुकांसाठी आवश्यक असणा-या प्रभाग रचनेला लागणारा वेळ आणि येणारा पावसाळा यांमुळे या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावरच आता सर्वोच्च न्यायालयात 17 मे रोजी अंतिम निर्णय होणार आहे.
(हेही वाचाः राज्यातील महापालिका निवडणुका दोन टप्प्यात! मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका कोणत्या टप्प्यात?)
राज्य निवडणूक आयोगाचे निवेदन
महापालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात, तर जिल्हा परिषदा आणि ग्राम पंचायतींसारख्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे देण्यात आल्याचे समजत आहे.
या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित
नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या 14 महापालिका निवडणुका प्रलंबित आहेत.
(हेही वाचाः महापालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार? राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात धाव)