अखेर शिवसेनेला ‘राजपुत्राकडून’च कार्यालयाचे लोकार्पण करुन घ्यावे लागले!

उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या नेत्यांना वेळ दिला जात नव्हता. त्यामुळे अखेर आदित्य ठाकरे यांच्याच हातून हे कार्य घडवून घेतले गेले.

139

मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीच्या नुतनीकरणाचे काम तब्बल १२ वर्षांपासून सुरू आहे. ज्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामुळे हे काम रखडले होते, त्या शिवसेनेने अखेर आपले बस्तान नवीन जागेत हलवले. आधी पक्षप्रमुखांच्या हस्ते याचे उद्घाटन करायचे होते. परंतु राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला. परंतु महापालिकेतील शिवसेना नेत्यांची आणि नगरसेवकांची इच्छा काही पूर्ण झाली नाही. ज्या मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुखांसाठी मुख्यालयातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेने लांबणीवर टाकले होते, तिथे मुख्यमंत्र्यांनीच पाठ फिरवल्याने अखेर राजा ऐवजी राजपुत्राकडून उद्घाटन करत शिवसेनेच्या नगरसेवकांनी नवीन कार्यालयात प्रवेश केला.

शेवटी आदित्य ठाकरेंनी केले उद्घाटन

मुंबई महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील तळ मजल्यावर मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून, शिवसेनेचे कार्यालय बनून तयार आहे. परंतु शिवसेनेने आपल्या जुन्या कार्यालयातील मुक्काम नवीन कार्यालयात न हलवल्यामुळे मुख्यालय इमारतीच्या नुतनीकरणाचे काम रखडून त्याचा बांधकाम खर्चही वाढला. त्यामुळे अखेर सर्वच बाजूंनी दबाव आल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही प्रकारे गाजावाजा न करता आपल्या नवीन कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर शनिवारी शिवसेना पक्ष कार्यालयाचेही उद्घाटन शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करुन शिवसेनेनेही नवीन कार्यालयात प्रवेश केला. या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यासाठी आजवर उद्घाटनाची तारीख पुढे ढकलली जात होती. परंतु प्रत्यक्षात उध्दव ठाकरे यांना आपल्या महापालिकेतील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला वेळ देता आला नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी याचे लोकार्पण करुन घेतले.

 

IMG 20210619 WA0092

(हेही वाचाः सरनाईकांचा ‘पत्र’प्रताप… म्हणाले, शिवसेनेने भाजपशी जुळवून घेतलेले बरे!)

असा वाढला खर्च

मुंबई महापालिका मुख्यालय आणि विस्तारित इमारतींच्या नुतनीकरणासाठी विविध करांसह ८५.३९ कोटी रुपयांचे काम आता तब्बल ११९.४४ कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहे. अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाला प्रत्यक्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जबाबदार आहेत. महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीतील तळ मजल्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष कार्यालय उपलब्ध करुन देऊनही, मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून या नवीन कार्यालयात न जाता या दोन्ही पक्षांनी आपली कार्यालये जुन्याच जागेत कायम ठेवली होती. त्यामुळे या इमारतींमधील पहिल्या व सहाव्या मजल्यांच्या नुतनीकरणाचे काम रखडले. पण आता हेच पक्ष नुतनीकरणावर हा खर्च वाढला कसा, असा सवाल करत आहे.

कार्यालय तयार, पण मुहूर्त नाही

शिवसेना पक्षाला साडेतीन वर्षांपूर्वी पक्ष कार्यालय उपलब्ध करुन दिले. तेव्हापासून दोन ते तीन वेळा शिवसेना पक्ष कार्यालयाची अंतर्गत सजावटही करण्यात आली. परंतु यापूर्वी केलेल्या सजावटीतील सामानांना वाळवी लागल्याने, फर्निचर बदलण्यात आले. पक्ष कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण होऊनही शिवसेना पक्ष कार्यालयाकडून नवीन कार्यालयाचा वापर होत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार होते. त्यामुळे उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तरीही शिवसेनेला या कार्यालयाचा ताबा घ्यावासा वाटले नाही. तसेच उध्दव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या नेत्यांना वेळ दिला जात नव्हता. त्यामुळे अखेर आदित्य ठाकरे यांच्याच हातून हे कार्य घडवून घेतले गेले.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांनी ‘पाळले’, उपमुख्यमंत्र्यांनी ‘तोडले’! मग कोरोनाचे ‘फावले’ तर…?)

महापालिका आयुक्तांना निमंत्रण नाही

महापालिकेची मालमत्ता असलेल्या आणि महापालिकेचा निधी खर्च झालेल्या या मुख्यालयातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याला, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना शिवसेनेने कोणतेही निमंत्रण दिले नाही. या कार्यक्रमाची जबाबदारी महापौरांनी स्वीकारली होती. त्यांनी आदित्य ठाकरे येणार असल्याने, आधीच आयुक्तांना लांब ठेवले. जर आदित्य ठाकरे आणि इक्बालसिंह चहल एकत्र आले असते, तर महापौरांना संवाद साधता आला नसता आणि त्यांना या कार्यक्रमाचे श्रेय घेता आले नसते. त्यामुळे महापौरांनी आयुक्तांच्या उपस्थितीमुळे कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणूनच आयुक्तांना बाजूला ठेवल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे मंत्री असून, ते महापालिकेच्या वास्तूत येत असल्याने आयुक्तांची उपस्थिती ही राजशिष्टाचाराला धरुन आवश्यक मानली जाणारी आहे. परंतु आपल्या नेत्यांच्या मध्ये आयुक्त नको, याच एका भावनेने आयुक्तांना या कार्यक्रमात डावलले गेल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः स्वबळावर सत्ता आणू म्हणाल, तर लोक जोड्याने मारतील! उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.