अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी! हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त! 

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी झाली आहे, तशी अधिकृत माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिली आहे.

रिलायन्स कंपनीचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणी एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी झाली आहे, तशी अधिकृत माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून दिली आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. C.I.S.F.च्या महासंचालकपदी सुबोध कुमार जयस्वाल यांची वर्णी लागल्याने, महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार हेमंत नगराळे यांच्याकडे देण्यात आला होता.


तर रजनीश शेठ यांच्यावर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. कारण हा पदभार हेमंत नगराळे यांच्याकडे होता. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

(हेही वाचा : हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला ती मर्सिडीज एनआयएच्या हाती… सापडल्या धक्कादायक वस्तू!)

दोन दिवस बैठकांनंतर घेतला निर्णय! 

सचिन वाझे यांचे थेट संबंध परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचले होते, त्यामुळे सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागितला होता. परिणामी सरकार अडचणीत सापडले होते, त्यामुळे दोन दिवसांपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत बैठक सुरु होत्या. अखेर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले होते. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा पार पडली. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही बैठक सुरु झाली ती सुमारे चार तास सुरु होती. मध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते. बुधवारी, १७ मार्च रोजी गृहमंत्राच्या बंगल्यावर याप्रकरणी बैठक पार पडली. त्यानंतर मुंबई पोलीस दलात हा मोठा बदल करण्यात आला.

कोण आहेत हेमंत नगराळे

1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे असून त्यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यासह देशभरातील इतर ठिकाणी काम केले आहे. या अगोदर हेमंत नगराळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी 2016 ते 2018 या दरम्यान काम पाहिले आहे. या बरोबरच डीआयजी पदावर सीबीआयमध्ये त्यांनी काम केले असून 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ताज महल हॉटेलमध्ये जाऊन जखमींना मदत करणार्‍यांमध्ये हेमंत नगराळे हे होते. पहिली नियुक्ती १९८९-९२ मध्ये नक्षलप्रभावित चंद्रपूर जिल्ह्यात झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here