पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी रविवारी, ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता ईडीचे १० अधिकारी दाखल झाले. त्यांनी ९.३० तास राऊतांची चौकशी केली. यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेऊन ते ईडीच्या कार्यालयात गेले. तिथेही रात्री उशिरापर्यंत राऊतांची चौकशी केल्यानंतर ईडीने अखेर राऊतांना १६ तासांच्या चौकशीनंतर रात्री उशिरा १२.४० वाजता अटक केली. तत्पूर्वी ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यब्रत कुमार हे दिल्लीवरून ईडी ऑफिसमध्ये दाखल झाले.
आता किती दिवसांची मिळणार ईडी कोठडी?
दिवसभर ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली होती. काही वेळानंतर राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांसह सीआरपीएफचा फौजफाटा हळूहळू वाढू लागला. त्यानंतर साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. या चौकशीच्या दरम्यान ईडीने दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील सर्च ऑपरेशन केले. ईडी अधिकाऱ्यांकडून राऊतांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया दुपारी ३-३.३० वाजताच्या सुमारास सुरु झाली. राऊतांना ताब्यात घेऊन ईडीचे पथक बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात आले. तिथेही राऊतांची चौकशी पुन्हा सुरु झाली. कागदपत्रांच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊतांना प्रश्न विचारले. त्यानंतर यात राऊतांचा सहभाग दिसत असल्याचे समोर येताच ईडीने रात्री उशिरा राऊतांची अटक दाखवली. आता ईडी राऊतांना सोमवारी, १ ऑगस्ट रोजी ईडीच्या विशेष न्यायालयासमोर हजर करणार आहे.
भाजपाला संजय राऊत यांची भीती – सुनील राऊत
संजय राऊत यांना अटक करण्याची कारवाई ही सूडबुद्धी आहे. भाजप संजय राऊत यांना घाबरत आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने नेमक्या कोणत्या प्रकरणात अटक केली हे स्पष्ट केले नाही. ईडीने पत्रा चाळीचा उल्लेखही केला नाही, असे संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत म्हणाले.
भाजप राऊत यांना घाबरतो म्हणणे हा विनोद – सुधीर मुनगंटीवार
सत्य कधी लपत नाही, संजय राऊत यांना अटक कायदेशीर झाली आहे. ही कारवाई भाजप संजय राऊत यांना घाबरतो म्हणून केली, असे म्हणणे हा मोठा विनोद आहे. ११ कोटी सदस्य संख्या असलेला भाजपा राऊत यांना घाबरेल, कशासाठी? कष्टाने हा पक्ष उभा राहिला आहे. हा पक्ष कुणाला घाबरत नाही, असे भाजपची नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community