अजित पवारांशी झालेली भेट ही गुप्त भेट नव्हती. त्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीत माझ्याशिवाय काँग्रेस-ठाकरे गटाचा प्लॅन ही केवळ चर्चा आहे. प्रत्यक्ष अशी वस्तूस्थिती नाही. असत्यावर आधारीत ती चर्चा आहे. संजय राऊतांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शरद पवार म्हणाले की, पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. ती गुप्त भेट नव्हती. मी भेटीनंतर काच खाली करून फुले स्वीकारून पुढे गेलो होतो. देशाची सत्ता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या हातात आहे. त्यांची भूमिका समाजात एकता टिकवून ठेवण्याची आहे, पण ते लोकांमध्ये फूट पाडत आहेत. मोदी आणि भाजपाविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशभरात २ सभा घेणार आहे. बिहार आणि कर्नाटकात मी सभा घेईन असं त्यांनी सांगितले. तसेच सत्तेचा गैरवापर आज होत आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूत नाही, कर्नाटकात नाही. आंध्र प्रदेशात भाजपा नाही. तेलंगणात नाही. महाराष्ट्रात भाजपा सरकार कसं सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडून आले. राजस्थानात, दिल्ली, पंजाब, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नाही. मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही असा टोलाही शरद पवारांनी भाजपाला लगावला. दरम्यान, गेल्या ८-१० दिवसांपासून मी महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. २ दिवसांपूर्वी सोलापूरच्या सांगोला परिसरात किमान १००० जणांनी माझी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी अडवली. पुणे, सातारा आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले. मी उद्या बीडच्या दौऱ्यावर आहे. मी जिल्ह्यात जावो ना जावो लोकं मला साथ देतात हा माझा अनुभव आहे. आम्ही मविआ म्हणून एकत्रित लोकांसमोर जाणार आहोत. महाराष्ट्रातल्या तरुणांनी कोणत्या रस्त्याने जायचे ते ठरवले आहे. त्याचा निकाल २०२४ च्या निवडणुकीत दिसेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा Rushi Sunak : मी आधी हिंदू आहे, नंतर पंतप्रधान – ऋषी सुनक)
Join Our WhatsApp Community