अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन दोन आठवडे झाले तरी खातेवाटपाचा घोळ कायम होता. नव्या मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यात अजित पवार यांना अर्थखातं मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याच बरोबर भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडे असलेलं सहकार हे खातंही राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे. या खाते विस्तारात शिंदे गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अब्दुल सत्तार कृषीमंत्री म्हणून त्यांची छाप टाकण्यात अपयशी ठरल्याचं बोललं जात आहे. मध्यंतरीच्या काळात विस्तारावेळी शिंदे गटातील पाच मंत्र्यांना नारळ दिला जाईल अशी चर्चा होती, त्यात अब्दुल सत्तार यांचंही नाव घेण्यात येत होतं. अवकाळी पाऊस, पाणी टंचाईच्या काळात सत्तार यांची कामगिरी चांगली नसल्याचं सांगण्यात येत होतं. तसंच त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारसमोर अडचणीही निर्माण केलेल्या होत्या. राज्यात शेतकऱ्यांत जाण्यासाठी सक्षम कृषीमंत्री असण्याची गरज व्यक्त होत होती.
(हेही वाचा – चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण; ‘इतक्या’ दिवसांनी लँडर उतरणार चंद्रावर)
राष्ट्रवादीला कृषी खातं देऊन भाजपानं काय साधलं…
अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. बंडात त्यांचा मोठा सहभाग होता. मात्र मंत्रीपदाच्या कामगिरीत त्यांनी चांगलं काम केलं नसल्याचं भाजपाकडून मंत्र्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणाऱ्या समितीला दिसत होतं. अशात सत्तार यांना हटवणं हे मुख्यमंत्र्यांना दुखावण्यासारखं होतं. त्यामुळे भाजपानं पाहुण्याच्या काठीनं साप मारल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे.
खाते वाटपात अजित पवार यांना अर्थ खातं मिळू नये यासाठी शिंदे गटातील नेते आग्रही होते. मविआच्या काळात अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांमुळं शिवसेनेच्या मंत्र्यांना निधी मिळत नव्हता, असं कारण बंडाच्या वेळी देण्यात आलं होतं. आता त्याच अजित पवारांकडे अर्थ खातं जाणार असेल तर काय करायचं, असा प्रश्न शिंदे गटातील आमदारांना पडलेला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community