अंटालिया ते मनसुख हत्या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार!

सतीश मोटेकर आणि मनीष सोनी या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले.

103

अंटालिया स्फोटके ते मनसुख हिरेन हत्याकांड या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला असल्याचा गौप्यस्फोट एनआयएने गुरुवारी, १ जुलै रोजी विशेष न्यायालयात केला आहे. ४५ लाखाचा हिशेब मिळाला असून यासाठी आणखी किती जणांना पैसे देण्यात आले, याचा तपास करायचा असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन्ही आरोपीची एनआयए कोठडी वाढवण्यात यावी, अशी मागणी एनआयएने केली. न्यायालयाने या दोन्ही आरोपीना ५ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

गुन्ह्याची कबुली 

अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सतीश मोटेकर आणि मनीष सोनी या दोघांची एनआयए कोठडी गुरुवारी संपली असता दोघांना एनआयएने न्यायालयात हजर केले होते. यावेळी एनआयएने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्हयात आणखी काही आरोपीचा समावेश असून त्यांचा शोध घ्यायचा असल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले, तसेच या सर्व प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झालेला असून ४५ लाखाचा हिशेब हाती लागला असून हे पैसे कुठल्या मार्गाने आले, याचा शोध घ्यायचा असल्याचे एनआयएने न्यायालयात सांगितले.

(हेही वाचा : अविनाश भोसले यांना ईडीचा समन्स)

एनआयए कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ 

न्यायालयीन कोठडीत असणारे प्रदीप शर्मा यांनी इतर आरोपींना सीम कार्ड पुरवले असून आरोपी सतीश मोटेकर याच्याकडे ३५ हजार ४०० रुपये मिळाले आहे, हे पैसे कोणी दिले, कुठून आले, याबाबत माहिती मिळवायची असल्याचे एनआयए न्यायालयात म्हटले आहे, मात्र आरोपीच्या वकिलांनी ही रक्कम मोठी नसल्याचे म्हटल्यावर ५ हजारासाठी हत्या होत असल्याचे एनआयएने न्यायालयात म्हटले आहे. तसेच मनसुख हिरेनच्या हत्येनंतर सतीश मोटेकर आणि मनीष सोनी हे नेपाळला गेले होते, ते तिकडे कुणाच्या सांगण्यावरून आणि कशासाठी गेले याचा तपास करायचा असल्याचे सांगून या दोन्ही आरोपीची ५ दिवसांची एनआयए कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोन्ही बाजू एकूण घेतल्यानंतर मनीष सोनी आणि सतीश मोटेकर या दोघांच्या एनआयए कोठडीत ५ जुलैपर्यंत वाढ केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.