शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

136

शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे, माजी आमदार राजन तेली, निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, माजी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल तसेच विचारांचे आदान-प्रदान होईल. त्यामुळे आपण या महाधिवेशनातून काहीतरी चांगले घेऊन जाल. आपल्या राज्यात-देशात गुरुला फार महत्व आहे. आई-वडिलानंतर गुरुचं, शिक्षकांचं स्थान हे आयुष्यामध्ये सर्वांच्या आदराचं आहे. शिक्षक हे भावी पिढीवर चांगले संस्कार घडवित असतात. जसे कुंभार हे मातीला आकार देतो तसेच शिक्षक हे भावी पिढी- नवीन पिढीला आकार देण्याचं, संस्कारित करण्याचे अतिशय मोलाचे काम करत असतात. तसेच डॉक्टर जीवदान देतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे जीवनाला दिशा देणारे काम करत आहेत. मला शिक्षकांबद्दल खूप आदर आहे. शिक्षकांचं समाजामध्ये फार मोलाचे योगदान आहे. समाज घडविण्याचे काम आपण करत आहात. डॉक्टर जसे वाहनावर डीआर लावतात तसे शिक्षकांसाठी टीआर लावण्याबाबत विचार होईल. जेणेकरुन शाळेत लवकर पोहोचता येईल. शिक्षकांवर जास्त बंधने केली जाणार नाहीत. मी आणि उपमुख्यमंत्री मिळून या सहा-सात महिन्यांमध्ये शेतकरी, शिक्षक, कष्टकरी, कामगार तसेच विद्यार्थीं या सर्वांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जे निर्णय शासनाने घेतले आहेत ते निर्णय हे राज्याचे हित लक्षात घेऊनच घेतले आहेत. सर्व सामान्य घटक वंचित राहू नये, असे केंद्रबिंदू मानून निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील घटकांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निर्णय घेतले आहेत.’

(हेही वाचा – राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, पण मुंबई महापालिकेत वजन मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजपचेच)

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘चंद्रपूरमधील पालडोह मधील शाळा ३६५ दिवस सुरू आहे. तोरणमाळ येथील शाळेला आदर्श निवासी शाळा पारतोषिक मिळाले आहे. शिक्षकांचे यासाठी समर्पण महत्वाचे आहे. ६१ हजार शिक्षकांसाठी ११ कोटी देण्याचा निर्णय तात्काळ घेतला. शिक्षकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. शिक्षक हे ज्ञान दानाचं काम करत असतो. पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. त्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही प्रकारची बंधने आम्ही टाकणार नाही. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. या स्पर्धात्मक युगात आपण सर्व पुढे गेलो पाहिजे.’

‘राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण सर्वेक्षणामध्ये देखील शिक्षकांनी मोठी झेप घेतली आहे. यात सरकारी शाळांचा वाटा खूप मोठा आहे. पालकांचा व समाजाचा सरकारी शाळेवरील विश्वास देखील आता वाढत चालला आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थी आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी कामगिरी इंडेक्स मध्ये एकूण १००० गुणांपैकी महाराष्ट्राला ९२८ गुण मिळाले आहेत. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. यामध्ये शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे अभिनंदन करतो. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. तरुण पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षकांचे योगदान फार महत्वाचे आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.