सांताक्रूझमध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

सांताक्रूझ पोलिसांना याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध कोविड १९ नियमाचे उल्लंघन करणे, दंगल माजवणे, मारहाण करणे या आशयाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सांताक्रूझ पोलिसांनी दिली,

84

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त शेरेबाजी केल्याप्रकरणी युवा सेनेने मंगळवारी राणे यांच्या जुहू येथील बंगल्यासमोर निदर्शने केली. या वेळी भाजप कार्यकर्ते आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीत दोन्ही बाजूचे १० ते १२ कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

त्यामुळे युवा सेनेने आंदोलन केले!

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा नाशिक, पुणे, महाड येथील पोलिस ठाण्यात केंद्रीय मंत्री यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. या दरम्यान नाशिक पोलिसांचे एक पथक राणेंना अटक करण्यासाठी मंगळवारी सकाळी कोकणाच्या दिशेने रवाना झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याच्या मुख्यमंत्री विरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच नितेश राणे यांनी युवा सेनेला ट्विटरवर आव्हान केल्यामुळे संतापलेल्या युवा सेनेचे नेते वरून सरदेसाई यांनी शेकडो युवा सेनेच्या कार्यकर्त्यासोबत नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यासमोर निर्देशने करण्यास सुरुवात केली होती.

(हेही वाचा : राणेंच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक-भाजप कार्यकर्त्यांचा राडा! पोलिसांनी केला लाठीचार्ज)

सेना – भाजपच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

दरम्यान राणेंच्या बंगल्याजवळ युवा सेनेचे कार्यकर्ते निदर्शने करीत असल्याचे कळताच भाजप आणि स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राणे यांच्या बंगल्याजवळ धाव घेतली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येताच दोघांनी घोषणाबाजी सुरू केली. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या राडेबाजीत दोन्ही पक्षाचे दहा ते बारा कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहे. सांताक्रूझ पोलिसांना याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या प्रत्येकी ५० ते ६० कार्यकर्त्यांविरुद्ध कोविड १९ नियमाचे उल्लंघन करणे, दंगल माजवणे, मारहाण करणे या आशयाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती सांताक्रूझ पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसानी सांगितले. बोरिवली पूर्वेतील कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात देखील शिवसेना आणि भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.