मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आग प्रतिरोधक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता महापालिकेच्या प्रसुतीगृहांमध्येही अशा प्रकारची यंत्रणा बसवली जाणार आहे. शहरातील चार आणि उपनगरांमधील प्रत्येकी ७ प्रसुतीगृहांमध्ये अशा प्रकारची यंत्रणा बसवली जाणार असून आगीसारखी दुघर्टना घडल्यास रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांना धुरामुळे गुदमरण्याची वेळ येणार नाही आणि धुरामुळे बाहेर पडण्यास येणाऱ्या अडचणीवर मात करून त्यांना बाहेर पडता येईल.
भंडारा येथील रुग्णालयात आग लागून दहा मुलांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना आणि त्यानंतर भांडुपमधील मॉलमध्ये आग लागून त्या रुग्णालयात दाखल रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर उपाययोजनेचा भाग म्हणून महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये आग लागून निर्माण होणारा धूर शोषून बाहेर काढण्याची यंत्रणा बसवली गेली आहे. ज्यामध्ये आयसीयू किंवा खाटेला खिळलेल रुग्णाला बाहेर पडता आले नाही तरी त्यांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू होणार नाही, अशा प्रकारची यंत्रणा ही यंत्रणा आहे.
(हेही वाचा दिल्लीत घडले आणखी एक श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड )
या उपनगरीय रुग्णालयांपाठोपाठ पश्चिम उपनगरांमधील सात, पूर्व उपनगरांमधील सात आणि शहरामधील चार अशा प्रकारे एकूण १८ प्रसुतीगृहांमध्ये धूर शोधक यंत्रणा आणि ध्वनी प्रक्षोभ यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना लक्षात घेता, महापालिकेच्या सर्व प्रसुतीगृहांचे फायर लेखापरिक्षण अर्थात फायर ऑडीट करण्यात आले. त्यात बहुतांशी प्रसुतीगृहांमध्ये आग सचेतक प्रणाली, धूर शोधक यंत्रणा तसेच ध्वनी प्रक्षोभ यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. त्यानुसार मुंबईतील १८ प्रसुतीगृहांमध्ये अशाप्रकारची यंत्रणा बसवली जात असून तीन भागांमध्ये विभागून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या १८ प्रसुतीगृहांमध्ये बसवण्यात येणाऱ्या यंत्रणांसाठी सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेने कार्यादेश दिल्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये या यंत्रणा १८ प्रसुतीगृहांमध्ये बसवल्या जातील असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहर भाग : ४ प्रसुतीगृह
- कंत्राटदार : ओमेक्स कंट्रोल सिस्टीम
- एकूण खर्च : विविध करांसह १ कोटी ०५ लाख रुपये
पूर्व उपनगरे : ०७ प्रसुतीगृह
- कंत्राटदार : ओेमेक्स कंट्रोल सिस्टीम
- एकूण खर्च : विविधा करांसह १ कोटी ७२ लाख
पश्चिम उपनगरे : ०७ प्रसुतीगृह
- कंत्राटदार : ओमेक्स कंट्रोल सिस्टीम
- एकूण खर्च : विविध करांसह १ कोटी ९५ लाख रुपये