लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’ या बालिश वृत्तीमुळे चांगलेच न्यायालयाच्या कचाट्यात सापडले आहेत. मागील पाच वर्षांत या स्वभावामुळे राहुल गांधींविरोधात ३ गंभीर प्रकरणे न्यायालयात दाखल झालेली आहेत. ज्यात त्यांना जेलची वारी करावी लागणार अशी परिस्थिती आहे. असे जर झाले तर राहुल गांधी ना निवडणूक लढवू शकत, ना ते खासदार राहू शकत, पर्यायाने ना विरोधी पक्षनेते राहू शकत, त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात येवू शकते.
नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नागरिकत्वावर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणी ते थेट न्यायालयात गेले. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारलाच घेरले आणि न्यायालयाला विनंती केली की, सरकारने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नागरिकत्वाची चौकशी करण्यात यावी. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणावर याच आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय थेट सरकारला या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचा आदेश देण्याची शक्यत आहे.
अमित शाह यांचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना हत्यारे म्हटल्यामुळे सुलतानपूर येथील एमपी एमएलए न्यायालयाने त्यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती. तेव्हा न्यायालयाने थेट म्हटले होते की, जर तुम्ही न्यायालयात हजर झाला नाही तर तुमच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला जाईल. त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात यावे लागले.
(हेही वाचा Mamata Banerjee यांनी बलात्कारित पीडितांसाठी बनवले रेट कार्ड; बंगालमधील पीडित डॉक्टरच्या वकिलाचा गंभीर आरोप)
वीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा?
वीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात तक्रार दाखल केली होती. लंडनमध्ये प्रवासी भारतीयांच्या समोर भाषण करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वीर सावरकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले होते. त्यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ‘वीर सावरकर यांच्या पुस्तकात असा उल्लेख आहे की, ‘वीर सावरकर म्हणतात, ते त्यांच्या ३-४ सहकाऱ्यांसोबत एका ठिकाणी बसले होते, तेव्हा एका मुसलमानाला मारहाण होत होती, हे पाहून आम्ही खुश होत होतो.’ याविषयावर बातम्या झाल्या आणि व्हिडीओ प्रसारित झाले. त्यावर सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मागणी केली की, राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या ज्या पुस्तकाचा उल्लेख करून हे वक्तव्य केले आहे, ते पुस्तक त्यांनी न्यायालयात सादर करावे, जर तसे पुस्तक नसेल तर राहुल गांधी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यामध्ये राहुल गांधी यांनी लंडनमध्ये वरील वक्तव्य केले आहे. तसेच वक्तव्यात असलेला उल्लेख वीर सावरकर यांनी त्यांच्या कोणत्याही पुस्तकात केलेला नाही, असा अहवाल पोलिसांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी भादवि कलम ५०० अंतर्गत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस जारी केली आहे. जर राहुल गांधी न्यायालयात हजर राहिले नाही, तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येईल.
पंतप्रधान मोदींचा अवमान केल्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा सुनावलेली
याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर सत्र न्यायालयानेही सुरत न्यायालयाच्या निर्णयाला योग्य ठरवले. उच्च न्यायालयानेही त्यांना ठोठावलेली २ वर्षांची कारावासाची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही साक्ष रहित केली.
२४ खटल्यांच्या जंजाळात अडकले
अशाच प्रकारे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर २४ खटले दाखल करण्यात आलेले आहेत. ज्यांची चौकशी सुरु आहे आणि न्यायालय या प्रकरणांवर एका पाठोपाठ एक राहुल गांधींच्या विरोधात नोटीस जारी करत आहे. त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून त्यांचे म्हणणे मांडावे लागणार आहे. यातील तीन महत्त्वाचे खटले राहुल गांधी यांच्यासाठी अडचणीचे ठरणार आहेत. एक नागरिकत्वाचा मुद्दा. त्यावर याच आठवड्यात सुनावणी होणार आहे. यामध्ये त्यांचे नागरिकत्व रद्द होण्याची शक्यता आहे. दुसरे प्रकरण अमित शाह यांचा अवमान करणारे प्रकरण आहे, त्यावरही न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामध्ये २ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. तिसरी घटना वीर सावरकर यांचा अवमान. या प्रकरणी न्यायालय राहुल गांधी यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देईल. यातही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community