देशाची नववी आणि दहावी वंदे भारत रेल्वे शुक्रवारपासून धावण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री नारायण राणे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी पहिल्यांदाच यंदाच्या अर्थसंकल्पातून १३ हजार ५०० कोटींची तरतूद झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस सांगितले. आणि पंतप्रधान मोदींनी देशाला सक्षम बनविण्यासाठी विटा उचलल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
नवव्या आणि दहाव्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, गेल्या आठवड्यात जो ग्लोबल सर्वे झाला, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एक नंबरवरचे नेते होते. यासाठी सर्वप्रथम मी मोदींचे अभिनंदन करतो. ही देशवासियांसाठी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तसेच वंदे भारत रेल्वे सुरू होणे हे महाराष्ट्र, मुंबईसाठी यशस्वी पाऊल आहे.
‘यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले? असे विचारले जाते. तर गेल्या काही वर्षांपासून रेल्वे विभागाकडे दुर्लक्षित होत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी मोठी तरतूद केली. महाराष्ट्रातील रेल्वे विभागासाठी पहिल्यांदाच १३ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा – आता शिर्डी प्रवास एका दिवसात शक्य; जाणून घ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे टाईम टेबल आणि तिकिटाचे दर)
Join Our WhatsApp Community