राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, 10 मार्चपर्यंत हे अधिवेशन गाजणार आहे. मात्र 1 मार्चपासून सुरू झालेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा गाजवला तो विरोधकांनी…त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे या आठवड्यात फ्रंटफूटवर राहिले. नेमका कसा होता हा आठवडा जाणून घेऊया.
मुनगंटीवारांनी गाजवला आठवडा!
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा गाजवला तो माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कोरोना परिस्थितीवर बोलतांना ठाकरे सरकारला चिमटे काढले. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आमची 72 तासांची मैत्री होती. तरीही ती कायम आहे, असे सांगतानाच आघाडी सरकार हा तर राज्यातील राजकीय लव्ह जिहाद होता, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. त्याचबरोबर त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचे सभागृहात दोन वेळा म्हटले. कोरोना काळातील भ्रष्टाचार, संजय राठोड, मुंबईतील मेट्रो सारखे प्रकल्प, आरे कारशेड, मुंबईत सुरू राहणारे पब, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अशा विविध विषयांवर विरोधकांनी पहिल्या आठडव्यात सरकारवर हल्ला चढवला.
मुख्यमंत्र्यांचे राजकीय भाषण
एकीकडे विरोधकांनी राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ठाकरे सरकारवर टीका केली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उद्धव ठाकरे यांनी उत्तरादरम्यान विरोधकांवर खास शैलीत टीका केली. मात्र मुख्यमंत्र्यांचे हे भाषण केवळ राजकीय झाल्याचे पहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खोचक टोमणे मारले. यामध्ये ‘सुधीर मुनगंटीवारांचे भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पहात असल्याचा भास झाला’, असे म्हणत त्यांनी मुनगंटीवारांना देखील कोपरखळी मारली. ‘मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की, मी नटसम्राट बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट…आणि शेवट असा केविलवाणा वाटला की ‘कोणी किंमत देता का किंमत!’, सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश…देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की, आमचं कसं होणार? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं’, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
(हेही वाचा : ‘आयसिस’मध्ये गेलेल्या अरीब माजिदला उच्च न्यायालयाचा जामीन! म्हणाले, त्याची ‘ती’ चूक होती! )
अजित पवारांच्या ‘त्या’ निर्णयाने काँग्रेस अस्वस्थ
सगळ्यात महत्वाचे म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-याच दिवशी विरोधकांनी आपला आक्रमक बाणा कायम ठेवत, वीज बिलांच्या मुद्द्यावरुन सभागृह दणाणून सोडले. प्रश्न उत्तरांच्या तासाला भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीचा मुद्दा उपस्थित केला. नियम ५७ अन्वये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी विधानसभेत भाजपने वाढीव वीज बिलांबाबत जोरदार बॅनरबाजी केली. मात्र विरोधकांचा आक्रमक पवित्रा बघता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडले जाणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे अजित पवारांनी ऊर्जा खाते असलेल्या काँग्रेसची गोची केल्याचे पहायला मिळाले.
नितेश राणेंनी भर सभागृहात काढले सेनेचे वाभाडे
एकीकडे सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस हे सभागृहात बॅटिंग करत असताना नितेश राणे यांनी देखील राणे शैलीत भर सभागृहात शिवसेनेवर जोरदार टीका केली. कोण हा दिनो मोरिया, हा सरकारचा जावई लागतो का? असा सवाल करत सभागृहात अभिनेता दिनो मोरिया आणि युवा सरचिटणीस वरून सरदेसाई यांच्यावर टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चर्चे दरम्यान नितेश राणे यांनी राणे स्टाईलने प्रहार केला. अभिनेता असलेला दिनो मोरिया हा सांगतो मी या सरकारमधील कोणतेही काम करून देतो. हा कुणाचा मित्र आहे, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. तसेच नाईटलाईफ गॅंग तयार होत असल्याचा देखील त्यांनी आरोप त्यांनी केला. नितेश राणे यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवासेना सरचिटणीस वरून सरदेसाई वरून सरदेसाई यांना राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवर देखील टीका केली. कोणी तरी सरदेसाई सारखा येतो आणि वाय प्लस दर्जा मिळवतो, असे म्हणत हे सरदेसाई कोण आहेत? सरकार यांना का पाठिंबा देते? असे एक ना अनेक प्रश्न विचारत जोरदार टीका केली.
अंबानी प्रकरण गाजणार!
पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयितरित्या आढळलेल्या गाडीच्या मालकाच्या मृत्यूची माहिती समोर आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना त्या गाडीचा मालक आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे संबंध, त्यांचे फोन रेकॉर्ड याची माहिती सभागृहासमोर मांडत त्या गाडीच्या मालकाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह खाडीत सापडला हे वृत्त आले. हा तपास एनआयएला द्यावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. मात्र गृहमंत्र्यांनी हा तपास एटीएसकडे दिल्याचे जाहीर केले. त्यामुळे उरलेले पुढचे तीन दिवस हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.