आसाममध्ये सध्या जी पूरस्थिती निर्माण झाली त्यामागे जिहादी मानसिकता कारणीभूत आहे, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांनी केला. गुवाहाटीतील पुराला आसामच्या शेजारी असलेल्या मेघालयातील एक खासगी विद्यापीठ जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री सरमा?
मेघालयातील यूएसटीएम विद्यापीठ एका बंगाली मुस्लीम व्यक्तीचे असून त्यांनी आसाम विरोधात पूर जिहाद सुरू केला आहे. आपण यापूर्वी खतं जिहाद आणि जमीन जिहादबाबत बोललो. पण आता पूर जिहाददेखील सुरु करण्यात आला आहे. अन्यथा या विद्यापाठीने अत्यंत क्रूरपणे त्यांच्या परिसरातील झाडे कापली नसती, ही झाडे कापल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून आले. त्यांनी हे सर्व जाणीवपूर्वक केले आहे. अन्यथा ते वास्तुविशारद नेमून ड्रेनेज सिस्टीम तयार करू शकले असते. मात्र, त्यांनी असे न करता, थेट झाडे कापण्यास सुरु केली, असे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) म्हणाले.
आसामच्या विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापाठीत जाऊ नये
पुढे बोलताना आसामच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी संबंधित विद्यापीठात जाऊन शिकू नये किंवा तेथील विद्यार्थ्यांना शिकवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या विद्यापीठाने सुरू केलेला पूर जिहादला उत्तर म्हणून आसामच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याने तिथे जाऊन शिक्षण घेऊ नये, तसेच आसामधील शिक्षकांनी तिथे जाऊन विद्यार्थ्यांनी शिकवू नये, तरच पूर जिहाद थांबेल, असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांनी अशाप्रकारे जिहाद होत असल्याचा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी खतं जिहाद आणि जमीन जिहाद होत असल्याचा आरोप केला आहे. “काही मुस्लीम शेतकरी भाजीपाला पिकवताना अमर्यादपणे खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हा एकप्रकारे खतं जिहाद आहे”, असे ते म्हणाले होते. तसेच काही मुस्लीम लोक आसाममध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेऊन जमीन जिहाद करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community