मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री पदाचा अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी सांगली आणि कोल्हापुरात येणारे पुराचे पाणी हे थेट मराठवाड्यात वळवण्यासाठी प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे . त्यासाठी जागतिक बँकेची मदत घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प युद्धपातळीवर सुरु करण्यात येण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
2019 साली सांगली आणि कोल्हापूरला महापूर आला होता. त्या पुरामुळे मोठी हानी झाली होती. यापुढे अशा प्रकारचा पूर आला तर काय करायचे याबाबत त्यावेळेस एक अभ्यास केला होता. त्यात वळण बंधारे आणि टनल सिस्टीमद्वारे पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यावर विचार झाला. त्या संदर्भात वर्ल्ड बँकेसोबत बैठक झाली, त्यांनी यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तात्काळ याचा डीपीआर तयार करुन तो वर्ल्ड बँकेकडे मान्यतेसाठी पाठवण्यात यावा, याबाबतही निर्देश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा ठाण्यानंतर नवी मुंबईतील ३० नगरसेवक शिंदे गटात होणार सहभागी)
ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होणारे प्रकल्प मंजूर
याव्यतिरिक्त समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात नेण्यावरही विचार झाला होता, आजच्या बैठकीत यावरही चर्चा झाली. त्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याशिवाय वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून वाहून जाणारे पाणी टनलच्या माध्यमातून 450 किमी आणून अनेक जिल्ह्यांना त्याचा वापर कसा होईल, याचे निर्देश देण्यात आले आहेत. 2019 साली जो स्मार्ट प्रोजेक्ट मंजूर केला होता, त्या अंतर्गत महाराष्ट्रात 10 हजार अॅग्री बिझनेस सोसायट्या तयार करुन 19 लाख शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आणि एंड टू एंड व्हॅल्यू चेन तयार करण्यासंदर्भातला प्रोजेक्ट होता, याला 3 हजार कोटी वर्ल्ड बँकेने दिले होते. दुर्दैवाने या प्रोजेक्टमधील फक्त 15 कोटी गेल्या अडीच वर्षात खर्च झाले. त्या प्रोजेक्टचे नाव आता बाळासाहेबांच्या नावाने आहे. आता या प्रोजेक्टला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी टाईम टेबल तयार झाला आहे. यातून शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community