मुख्यमंत्र्यांसाठी एका रात्रीत ‘राजमार्ग’ तयार केला, पण…

120

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असून मागील काही दिवसांपासून वैद्यकीय उपचार घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारपणानंतर प्रथमच विधिमंडळमध्ये उपस्थित राहणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना विना अडथळा आणि कोणत्याही प्रकारच्या त्रास न होता वाहनातून प्रवास करता यावा यासाठी महापालिकेच्या रस्ते विभागाचे अधिकारी डोळ्यात तेल घालत काम करत आहेत. त्यामुळे बी.जी.खेर या रस्त्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या या रस्त्याचे काम बुधवारी पहाटेपर्यंत तातडीने तात्पुरते पूर्ण करत मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला सुरळीत जाता येईल, अशा पध्दतीने तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री चहापानाला उपस्थित न राहिल्याने चर्चेला उधाण

विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या चहा पानावर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला. परंतु, या चहापानाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहिले नव्हते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार झाल्यानंतर त्यांना पुरेसा आराम करता आल्याने आता त्यांच्याच सूचनेनुसार हे अधिवेशन बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुख्यमंत्री चहापानाला उपस्थित न राहिल्याने पुन्हा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.  मुख्यमंत्री या चहापानाला गैरहजर राहण्याचे मुख्य कारण म्हणजे ते ज्या मार्गाने विधीमंडळमध्ये जाणार आहे, त्या रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

(हेही वाचा – भास्कर जाधवांकडून पंतप्रधानांची विधानसभेत नक्कल! सभागृहात गदारोळ )

मंगळवारी या रस्त्याच्या पृष्ठभागाचा थर काढण्यात आला होता. त्यामुळे त्यातून मुख्यमंत्र्यांना प्रवास करणे नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्य नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. या रस्त्याचा पृष्ठभाग समतल नसल्याने त्यातून वाहन गेल्यास प्रवास करताना त्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु असल्याने रस्त्याचा पृष्ठभाग समतल राखण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने तात्पुरती काम करण्याच्या सूचना रस्ते विभागाच्या माध्यमातून कंत्राटदाराला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावर ओरखडे मारत खोदलेल्या या रस्त्यावर बिटूमनचा थर चढवत वाहनातील प्रवास सुरळीत होईल, अशाप्रकारे रस्त्याचे काम रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे.

वाहतुकीच्या दृष्टीकोनातून रस्त्याचे काम पूर्ण

रस्ते विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,  या रस्त्यांचे काम नियमित कामांप्रमाणेच हाती घेतले होते. त्याचे काम ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारच्या पहाटेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीकोनातून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे आता काही दिवसांनी त्यावर मास्टीक अस्फाल्ट थर चढवण्यात अगदी हा रस्ता वाहतुकीसाठी तुळतुळीत बनवण्यात येणार आहे. वर्षा निवासस्थानावरुन  मुख्यमंत्री विधीमंडळात याच रस्त्यावरून जाणार असल्याने या रस्त्याचे काम तातडीने होणे आवश्यक होते. परंतु थंडीचा मोसम असल्याने रात्री रस्त्यावर चढवण्यात आलेल्या बिटूमिनच्या थरावर अधिक चांगल्याप्रकारे हजारो टन वजनाचा रोलर चालवत रस्त्याचा पाया अधिक सक्षम बनवणे आवश्यक असल्याने दिवसभरात हा रस्ता चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी रस्ता बनला असला तरी तो वाहतुकीच्या दृष्टीकोनातून अधिक मजबूत बनणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्र्यांनी यावरुन बुधवारी जाणे टाळले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुरुवारी हा रस्ता अधिक चांगल्या प्रकारे बनवला जाणार असल्याने त्यावरून मुख्यमंत्री महोदय प्रवास करतील, अशी अपेक्षा रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.