चिपळूणला उभे करण्यासाठी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय!

अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले.

132

चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तातडीने स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज पुरातून सावरत असलेल्या चिपळूण शहराला आणि बाजारपेठेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. गेल्या आठवड्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सगळ्यात मोठा फटका हा चिपळूण शहराला बसला होता. शहरातील अनेक भागात 20 फुटापर्यंत पाणी वाढल्याने लोकांचे या पुरामुळे अतोनात नुकसान झाले. शहरात सगळीकडे खराब झालेल्या वस्तू आणि चिखलामुळे दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शहर स्वच्छ करण्याला प्राधान्य असल्याने त्यासाठी हा 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. याशिवाय शहरातील स्वच्छता कार्याला वेग आणण्यासाठी मुख्याधिकारी दर्जाचे 5 अधिकारी तातडीने नियुक्त करण्यात येणार असल्याचे देखील शिंदे यांनी जाहीर केले आहे.

बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करणार

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी साधने आणि मनुष्यबळ देखील गरजेचे आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या स्वच्छता साधनसामग्रीसह पाठवू, असेही त्यांनी जाहीर केले. चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पाण्यापासून असलेला धोका लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून लागणारे बोटी, लाईफ जॅकेट्स यासारखे साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना त्यांनी महाड मुख्याधिकार्याकडे केली.

(हेही वाचा : ठाकरे सरकार टिकून राहावे ही राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा!)

शिवसेनेकडून टू व्हीलर दुरुस्तीचा अभिनव उपक्रम

चिपळूण शहरात पुराचे पाणी घुसल्याने या पाण्यात अनेक वाहने वाहून गेली तर काही दुचाकी चिखलात माखल्याने नादुरुस्त झाल्या. आशा दुचाकी विनामूल्य दुरुस्त करून देण्याचा उपक्रम शिवसेनेतर्फे हाती घेण्यात आला आहे. स्थानिक शिवसेना उपविभागप्रमुख बालाजी कांबळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून ठाण्यातील नगरसेवक राजेश मोरे यांनी यासाठी लागणारे सारे साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. आज नगरविकास मंत्री शिंदे यांनी या उपक्रमाच्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी केली. आजच्या दिवसात 15 दुचाकी दुरुस्त करून देण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.