नारायण राणे प्रथमच करणार बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन

हा क्षण नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजवरच्या क्षणाच्या तुलनेत अमूल्य असा ठेवा ठरणार आहे.

68

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन आशीर्वाद घेणार आहेत. शिवसेना पक्ष सोडल्यानंतर बाळासाहेबांनी नारायण राणे यांना लक्ष्य केले होते. परंतु नारायण राणे हे साहेबांना पितृतूल्य तसेच गुरुतूल्य मानत असल्याने, त्यांनी कधीही त्यांना प्रत्युत्तर दिले नाही. एवढेच नाही तर बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेता न आल्याने, तसेच अंत्ययात्रेत सहभागी होता न आल्याने त्यांना त्याचे अनावर दुःख झाले होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर प्रथमच या स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. त्यामुळे तो क्षण नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आजवरच्या क्षणाच्या तुलनेत अमूल्य असा ठेवा ठरणार आहे.

राणे करणार पोलखोल

शिवसेनेत शिवसैनिक ते शाखाप्रमुख आणि पुढे नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अशी पदे भूषवणाऱ्या नारायण राणे यांनी पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे पक्षाला सोडचिठ्ठी देत, २००५ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तिथेही मंत्रीपद भूषवल्यानंतर राणे यांनी सुमारे १४ वर्षांनी म्हणजे २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राज्यसभा सदस्यपद भूषवणाऱ्या राणे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील काम करण्याची चमक पाहून त्यांना केंद्रीय मंत्रीपद बहाल केले. या मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर राणे हे जन आशीर्वाद यात्रेमार्फत केंद्राच्या योजना व कामे लोकांपर्यंत पोहोचवताना, राज्यातील महाविकास आघाडीची व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताधारी पक्षांची पोलखोल करणार आहेत.

(हेही वाचाः सेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंचे शक्ती प्रदर्शन… अशी आहे राणेंची जन आशीर्वाद यात्रा)

१९ ते २१ ऑगस्ट पर्यंतच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीला वंदन करुन आशीर्वाद घेणार आहेत.

राणेंना होती बाळासाहेबांच्या भेटीची ओढ, पण…

शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे आणि बाळासाहेब ठाकरे कधीही एकत्र आले नाहीत. बाळासाहेबांच्या प्रति हृदयात मायेचा आणि प्रेमाचा ओलावा असल्याने कधी तरी साहेबांशी बोलावं असे राणे यांना वाटत असले, तरी त्यांच्या दोघांत उभे असायचे ते शिवसैनिक. राणे यांनी साहेबांना त्रास दिला आहे, या समजुतीपोटी शिवसैनिक कायम राणे यांच्या विरोधात उभे राहिले. त्यामुळे बाळासाहेबांची प्रकृती अस्वस्थ झाली तेव्हा राणे हे प्रचंड चिंतेत असायचे. एकवेळ साहेबांना भेटून घ्यावे असे त्यांना वाटत असे. परंतु शिवसैनिकांमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर ते प्रचंड अस्वस्थ होते, हे त्यावेळी प्रसामाध्यमांतून समोर आले होते.

आधी साहेबांचा आशीर्वाद, मग जन आशीर्वाद

त्यामुळे बाळासाहेबांच्या निधनानंतर प्रथमच ते शिवाजी महाराज पार्कमधील स्मृती स्थळाला भेट देणार आहेत. आजवर केवळ नारायण राणे म्हणून या स्मृती स्थळाला इच्छा असूनही भेट देऊ न शकणारे राणे, आता केंद्रीय मंत्री म्हणून बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या राणे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अपार श्रध्दा आहे. ही श्रध्दा असल्याने त्यांनी केंद्रीय मंत्री झाल्यानंतर बाळासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.

(हेही वाचाः शिवसेना म्हणतेय ‘राज्यपाल महोदय, आठवा महिना लागला!’)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.