राज्यातील माळढोक पक्ष्याचे अस्तित्व मिटण्यापूर्वी राजस्थानातून माळढोक पक्ष्याला राज्यात आणण्याचा पुनर्विचार वनविभागाने सुरु केला आहे. माळढोक पक्ष्यासाठी खास ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात नानौज माळढोक पक्षी अभयारण्यात राजस्थानातून पक्ष्याची पिल्ले आणून पाळायची यासाठी प्राथमिक स्तरावर तयारी सुरु झाली आहे. हा प्रस्ताव नागपुरातील वनविभागाच्या मुख्य कार्यालयात मंजुरीसाठी लवकरच पाठवला जाणार आहे.
माळढोक पक्ष्यांची पिल्ले आणण्याचा वनविभागाचा विचार
नुकतीच कर्नाटक राज्यातून सोलापुरात माळढोक पक्षी अभयारण्यात मादी माळढोक दाखल झाल्याने पक्षीप्रेमीसह वनविभागही तिच्या देखभालीत गुंतला. वनविभागाच्या दाव्यानुसार विणीच्या हंगामात राज्याला भेट देणारी एकच मादी माळढोक पक्षी राज्यात आहे. प्रजननासाठी राज्याच्या भेटीला आलेल्या मादीपाठोपाठ नर माळढोकही राज्यात येईल, अशी आशा वनाधिकाऱ्यांना आहे. मात्र एकाच माळढोक पक्ष्यावर अवलंबून राहणे योग्य नसल्याने राजस्थानात मुबलक संख्येत आढळून येणाऱ्या माळढोक पक्ष्यांची पिल्ले राज्यात आणण्याचा वनविभागाचा विचार आहे. पक्षीप्रेमीच्या दाव्यानुसार विदर्भात वरोरा येथेही अधूनमधून माळढोक पक्षी आढळून येतो.
माळढोक पक्ष्यासाठी वनविभागाने जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. स्थानिकांनाही माळढोक पक्ष्याचे महत्व समजले आहे. माळढोक पक्ष्याचे महत्व लोकांमध्ये बिंबवण्यासाठी आम्ही 500 लहान आकाराच्या माळढोक पक्ष्याच्या मूर्तीचे वाटप करणार आहोत.
– डॉ. व्ही क्लेमेंट बेन, अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक, (वन्यजीव) पश्चिम, मुंबई
मादी माळढोकच्या देखरेखीसाठी
नानौज माळढोक अभयारण्यात आढळून येणाऱ्या मादी माळढोक पक्ष्याच्या सुरक्षिततेसाठी पाच वनरक्षक आणि प्रमुख मिळून चोवीस तास देखरेख ठेवली जाईल. त्यासाठी खास चौकी उभारली जाणार आहे. ती सध्या गौत्रे आणि शिवाजीनगर परिसरात हिंडत आहे. सोयाबीनच्या पिकांवर येणारी किडे तिचे प्रमुख खाद्य आहे. मात्र गरुड पक्ष्याला पाहताच ती घाबरते.