बॉम्बची भाषा करणारे लवंगीसुद्धा लाऊ शकले नाहीत, शेलारांचा घणाघात

162

मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फटाक्यांचं राजकारण सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर आरोप करत, बॅाम्ब फोडला होता. मात्र त्यालाच नवाब मलिकांनी प्रत्युत्तर देत मी हायड्रोजन बॅाम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं. आता यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर चांगलाच हल्ला-बोल केला आहे.

शेलारांचे मलिकांवर टीकास्त्र

हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे, वसुली, आंतरराष्ट्रीय फोन अशी नावं आणि असे शब्द आणून त्यांनी खूप मोठं चित्रं निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. या सर्व प्रकरणाशी फडणवीसांशी संबंध जोडणं म्हणजे बिरबलाने जमिनीवर कोळसा ठेवून ऊंचावर ठेवलेली बिर्याणी शिजवण्यासारखा आहे. मलिक यांनी तसाच प्रयत्न केला. पण त्यात काहीच तथ्य नाही. राज्य सरकारच्या यंत्रणा कामाला लागूनही ते फडणवीसांवर आरोप लावू शकले नाहीत, असं शेलार यावेळी म्हणाले. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे साधी लवंगीसुद्धा लावू शकले नाहीत. त्यांनी लवंगी लावण्याचा प्रयत्न केला त्यातही हात पोळले. नवाब मलिक यांची हतबलता आणि घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा त्यांना ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी अवस्था झाली आहे, अशा शब्दात आशिष शेलार यांनी मलिकांवर टीकास्त्र सोडले आहेत.

यावर मुन्ना यादवच बोलतील

मुन्ना यादव, हाजी अराफत आणि हाजी हैदर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची चौकशी केल्यानंतरच त्यांची नेमणूक करण्यात आली होती. मुन्ना यादववर एक आरोप आहे. त्याचं स्पष्टीकरण स्वत: मुन्ना यादव करतील. मला माहीत असलं तरी यात राष्ट्रवादीचे कनेक्शन आहे. यादवच त्यावर बोलतील. सर्व सोडा, तुमचं दोन वर्षापासून सरकार आहे. तुमच्या पक्षाकडेच गृहमंत्रीपद आहे. मग हाजी अराफत आणि हाजी हैदरवर तुम्ही एनसी सुद्धा का दाखल केली नाही? असा सवाल त्यांनी केला.

(हेही वाचा : स्कायवॉक ठरतोय सफेद हत्ती!)

मलिक तथ्यहिन बोलतात

गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा. यात कोणताही गैरकारभार फडणवीसांच्या काळात झाला नाही. १४ कोटींच्या बनावट नोटांप्रकरणी अटक करण्यात आलेला हाजी अराफतचा भाऊ इम्रान आलम शेख हा काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. जेव्हा त्याच्यावर आरोप झाला तेव्हा तो काँग्रेसच्या पदावर होता. आता तुम्ही आरोप करत आहात, पण तो आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मलिक हे तथ्यहिन बोलत असल्याचं सिद्ध होतं, असा दावा त्यांनी केला. हाजी हैदर हा बांगलादेश तर सोडा, पण मुंबईत त्यांच्यावर कोणताही आरोप नाही, असंही त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांचा रियाज भाटीशी कोणतोही संबंध नाही त्यामुळे उगाच बोटं दाखवू नका, नाहीतर उरलेली चार बोटं तुमच्याकडे वळतील, या शब्दांत शेलार यांनी नवाब मलिकांना यावेळी खडसावलं.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.