शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्यामुळे सोमवारी, २४ मे रोजी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी (ब्रेन ट्युमर) असून त्यांना सोमवारी अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने माहिमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संखला यांच्या देखरेखीखाली जोशी यांच्यावर उपचार सुरू आहे. मंगळवारी रुग्णालयाकडून मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत बुलेटिन जारी करण्यात आले. जोशी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना तूर्तास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे, असे बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Rahul Gandhi : छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी – चंद्रशेखर बावनकुळे)
मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक आणि कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांना जोशी सर असेही संबोधले जाते. ते ८६ वर्षांचे आहेत. शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौरही झाले. तर शिवसेना भाजपाच्या युतीचे सरकार जेव्हा १९९५ मध्ये आले तेव्हा मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाले होते. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी विविध पदे भूषवली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community