केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन पोलीस ठाण्यात साक्षीसाठी बोलावण्यात आले. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे. संबंधितांवर एफआयआर नोंदवावा, तसे न केल्यास भाजपा सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल, तर त्यांच्यावर सुद्धा आयपीसी ३४ अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल, असेही फडणवीस म्हणाले.
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते!
CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.
(1/3)@MeNarayanRane #NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2021
नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरले!
फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ अ अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा. सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. याप्रकरणी गुरुवारी निकाल दिला जाणार आहे, असे न्यायालयाने सांगितले होते. यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नितेश राणेंना जेल मिळणार की बेल हे निश्चित होणार आहे.