एकीकडे काँग्रेसकडून भारत जोडो यात्रेचा मोठा गाजावाजा केला जात असताना माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र या यात्रेकडे फिरकलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘वेगळीच’ कुजबुज सुरू झाली आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल होऊन तीन दिवस उलटले. काॅंग्रेसचे नेते आणि पदाधिकारी त्यात सहभागी झाले आहेत. परंतु, नांदेडच्या शेजारीच असलेल्या लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख, त्यांचे आमदार बंधु धीरज देशमुख अद्याप भारत जोडो कडे फिरकलेले नाहीत. किंबहुना लातूरमधील काँग्रेसचे कार्यकर्तेही या यात्रेत सहभागी झालेले दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
देशमुख बंधूंच्या या भूमिकेची कुजबुज नांदेडपासून थेट मंत्रालयापर्यंत सुरू आहे. चव्हाण- देशमुख यांच्यातील अंतर्गत वाद आणि संघर्षाची किनार या अनुपस्थितीला नाही ना, असाही सवाल उपस्थित होत आहे. नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेवर अशोक चव्हाण यांचा प्रभाव दिसत असल्यामुळे देशमुखांनी तेथे जाणे टाळल्याचीही चर्चा आहे.
बेबनाव वेगळ्या संकेतांचा दर्शक?
हिंगोली जिल्ह्यात जेव्हा यात्रा पोहचेल, तेव्हा तेथे दोन्ही देशमुख हजेरी लावणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. मात्र, काँग्रेस पक्ष एकीकडे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असताना, स्वपक्षीयांतील बेबनाव वेगळ्या संकेतांचा दर्शक असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community