वरळी विधानसभेतील आमदार आदित्य ठाकरे यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली असून पक्षातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर, संतोष खरात यांच्या पाठोपाठ आता दत्ता नरवणकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. आदित्य ठाकरे हे पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रभर फिरत करत असले तरी त्यांना आपला मतदार संघ फुटण्यापासून वाचवता आलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांच्या मतदार संघातील माजी नगरसेवक व पदाधिकारी यांना पक्षात घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने आदित्य ठाकरे यांची कोंडी करून टाकली आहे.
( हेही वाचा : राज्यात कोरोना आणि एच3एन2 चा दुहेरी अटॅक )
शिवसेना (उध्दव ठाकरे) नेते व आमदार आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून निवडून आल्यानंतर या मतदार संघाची मजबूत बांधणी करण्यासाठी पक्षाने माजी आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार सुनील शिंदे यांची वर्णी विधान परिषदेवर लावली. त्यामुळे मुंबईतील हे एकमेव विधानसभा क्षेत्र असून जिथे विधानसभेचे एक आमदार व विधान परिषदेचे दोन अशाप्रकारे एकूण तीन आमदार आहेत. याबरोबरच या विधानसभा मतदार संघात किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर हे दोन माजी महापौर, आशिष चेंबूरकर हे माजी बेस्ट समिती अध्यक्ष यांच्यासह दत्ता नरवणकर, संतोष खरात आणि समाधान सरवणकर हे सहा नगरसेवक शिवसेनेचे होते. त्यामुळे वरळी विधानसभेत पूर्णपणे आदित्य ठाकरे यांचा प्रभाव असतानाही आधी समाधान सरवणकर हे आपल्या वडिलांसमवेत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर संतोष खरात आणि आता दत्ता नरवणकर यांनीही शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आता या मतदार संघात चेंबूरकर, पेडणेकर आणि आंबेकर हे तीनच माजी नगरसेवक पक्षाकडे उरले आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेचा मतदार संघ कमजोर करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील माजी नगरसेवकांना पक्षात घेऊन एकप्रकारे ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न करत असून एकप्रकारे मतदार संघ कमजोर होत असताना आदित्य ठाकरे आता हा मतदार संघ कशाप्रकारे राखतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Join Our WhatsApp Community