भाजपाचे माजी नगरसेवक आजही मोदी-फडणवीस यांच्यावरच अवलंबून

84

मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर प्रत्येक राजकीय पक्षांचे माजी नगरसेवक अणि इच्छूक उमेदवारांचे लक्ष लागून आहे. शिंदे गट फुटल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक व इच्छूक उमेदवार हे द्विधा मनस्थित असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी मुंबईचे मैदान मोकळे झाले आहे. त्यामुळे हे मैदान मारण्यासाठी त्यांच्याकडून थेट रस्त्यांवर उतरून काम केले जात नसून आजही भाजपाचे माजी नगरसेवक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अवलंबून असल्यासारखे वावरत आहेत.

भाजपाच्या नगरसेवकांना सत्ता उपभोगण्याची संधी हुकल्याची सल

मुंबई महापालिकेच्या सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले असून प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवताना भाजपाला एवढया मोठ्या प्रमाणात यश मिळवता आले. आजवर शिवसेना-भाजपा युतीमध्ये भाजपाचे २९ ते ३४ एवढेच नगरसेवक निवडून येत होते, परंतु २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेनेचे ८४ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यानंतर भाजपाने पहारेकरी म्हणून जबाबदारी सांभाळत सत्तेपासून लांब राहिले. त्यामुळे सत्तेच्या समीप पोहोचूनही भाजपाच्या नगरसेवकांना सत्ता उपभोगण्याची संधी हुकल्याने याची सल आता भाजपाच्या नगरसेवकांना आहे.

(हेही वाचा शिंदे गटाला मनसेत विलीन व्हायचे असेल तर स्वागतच – राज ठाकरे)

भाजपाचे ८२ नगरसेवक रस्त्यांवर उतरुन जनतेच्या सेवेत राहणे आवश्यक

त्यामुळे सन २०२२च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवण्याची स्वप्ने पाहिली जात आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष फटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट बाळासाहेब शिवसेना गट स्थापन केला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. भाजपासोबत मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तसेच वंचित आघाडी तसेच आम आदमी पार्टी आदी पक्षांनाही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजुला महापालिकेतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेची दोन छकले पडलेली असताना याचा फायदा भाजपाच्या माजी नगरसेवकांकडून उठवणे आवश्यक आहे. यासाठी भाजपाचे ८२ नगरसेवक हे रस्त्यांवर उतरुन जनतेच्या सेवेत राहणे आवश्यक आहे. परंतु भाजपाचे मोजकेच काही नगरसेवक हे रस्त्यावर दिसून असून बहुतांशी नगरसेवक हे डोक्यात सत्तेची मस्ती चढवून वावरत आहेत. त्यामुळे आपण निवडून येवू याच अविर्भावात ते रस्त्यावर उतरत नाही. मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच २०१७ मध्ये निवडणून आलेल्या ८२ माजी नगरसेवकांना आजही या नेत्यांच्याच नावावर पुन्हा निवडून येवू अशाप्रकारचा विश्वास वाटत आहे.

भाजपाला आधी ८२ नगरसेवकांची संख्या टिकवणे हे गरजेचे

भाजपाला महापालिकेत सत्ता आणण्यासाठी आधी यापूर्वी निवडून आलेले ८२ नगरसेवकांची संख्या टिकवणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे भाजपा पक्ष हा ८२ नगरसेवकांची संख्या कायम राखून त्याशिवाय अतिरिक्त नगरसेवक निवडून आणणे ही महत्वाची जबाबदारी आहे. महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवलेल्या भाजपाच्या महापालिका निवडणूक संयोजन समितीचे प्रमुख ऍड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत १३४ नगरसेवक निवडून आणणे हे भाजपाचे मिशन असल्याचे सांगितले. परंतु हे मिशन गाठण्यासाठी भाजपाला आधी ८२ नगरसेवकांची संख्या टिकवणे हे गरजेचे आहे. परंतु राज्यातील सत्ता सारीपाटामध्ये भाजपाचे नेते मंडळी गुंतलेले असून यापूर्वी निवडून आलेले ८२ नगरसेवकच भाजपाला दगाफटका देऊ शकतात असे बोलले जात आहे. भाजपाकडून मिशन १३४ पूर्ण करण्याचे स्वप्न पाहताना ८२ नगरसेवकांचा विजय गृहीत धरला जात आहे. त्यामुळे नवीन नगरसेवक निवडून आणण्याच्या प्रयत्नात या ८२ नगरसेवकांकडे होणारा दुर्लक्ष हा भाजपाला महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्यास कारणीभूत ठेवू शकतो, असे चित्र दिसून येत आहे. या उलट शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार हे पक्ष फुटल्यानंतर द्विधा मनस्थितीत असतानाही जनतेसाठी उपलब्ध होत आहे. जनतेला सहज उपलब्ध होऊन त्यांची कामे करत आहेत. त्यातुलनेत भाजपाचे काही मोजकेच माजी नगरसेवक हे जनतेला उपलब्ध होत असल्याने मोदी आणि फडणवीस यांच्यावर नावावर हे नगरसेवक निवडून येणार की स्वत:च्या कामावर असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

(हेही वाचा उद्धव ठाकरे विश्वासास पात्र नाही! राज ठाकरे यांचा घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.