ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केलेत ते कुठे? अनिल देशमुखांचा सवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात दाखल

176

मागील काही दिवसांपासून गायब असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. सकाळी ते ईडी कार्यालयात हजर झाले असून त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांची केवळ चौकशी केली जाईल की त्यांना अटक होईल याकडे देखील साऱ्यांचे लक्ष लागून आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणासंदर्भात अनिल देशमुख सध्या ईडीच्या रडारवर आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची कार आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंग हे दोघेही वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने वारंवार अनिल देशमुखांना चार ते पाच वेळा समन्स बजावले होते. अखेर आज अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार आहेत. दरम्यान, ‘ज्या परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केले ते आरोप करणारे परमबीर सिंग आहेत कुठे?, असा सवाल देखील अनिल देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

‘आरोप करणाराच पळून गेला’

देशमुख असेही म्हणाले, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग आज कुठे आहेत? प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार परमबीर सिंग भारत सोडून परदेशात पळून गेले आहेत. आरोप करणाराच पळून गेला. आज पोलीस खात्यातील अनेक अधिकारी, व्यवसायिक यांनी पोलीस स्टेशनला परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.”

‘चौकशीसाठी ईडीला संपुर्ण सहकार्य करणार’

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात दाखल राहण्यासंदर्भात ट्वीट केले आहे. असे म्हटले की, उच्च न्यायालयाने माझ्या संविधानातील अधिकारात मला विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र दिले असतानाही मी आज ईडीच्या कार्यालयात जाऊन चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य करणार आहे.

‘३० वर्षात माझ्यावर एकही आरोप नाही’

यासह “नमस्कार मी अनिल देशमुख बोलतोय. मला जेव्हा ईडीचा समन्स आला तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही अशा चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा मला ईडीचा समन्स आला तेव्हा तेव्हा मी त्यांना कळवले की माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी चालू आहे. मी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये येईल.” गेल्या ३० वर्षात माझ्यावर एकही आरोप झाला नाही, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘राजकीय आणि सामाजिक जीवनात एकदाही आरोप झाला नाही. पण आज सिंग देश सोडून पळू गेले, वाझे तुरुंगात आहेत, या लोकांनीच माझ्यावर केलेल्या आरोपाची ईडी आणि सीबीआय चौकशी करत आहे.’

(हेही वाचा- मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! पुरावे शरद पवारांनाही देणार)

असे करण्यात आले होते आरोप…

अनिल देशमुख यांच्यावर ते गृहमंत्री असताना मुंबईचे तत्काली पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच आरोप केले होते. सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रं लिहून देशमुख यांच्या वसुलीची पोलखोल केली होती. तसेच, गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येकदा वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले. अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट देऊन कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे, यासारखे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केले होते.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.