शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात केलेल्या बंडानंतर राज्यातील शिवसेनेचे अनेक आमदार आणि मंत्र्यांनी त्यांना पाठिंबा दिला. राजकीय सत्तासंघर्षादरम्यान, पुणे जिल्ह्यातही याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली असून जिल्ह्यातील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये देखील मोठी अस्वस्थता दिसण्यास सुरूवात झाली आहे. पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे देखील शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आज बुधवारी पुण्यात शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
(हेही वाचा – मोठी बातमी: एकनाथ शिंदे 30 जूनला मुंबईत येणार; बहुमताची करणार चाचणी)
आज विजय शिवतारे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर शिवतारे आपला निर्णय जाहीर करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील कामे केली जात नाहीत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीशी असलेली युती तोडावी अशी चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे शिवतारेंकडून ही बैठक बोलावण्यात आली आहे.
पत्रकार परिषद भूमिका करणार जाहीर
सर्व पदाधिकाऱ्यांसह बैठकांचा सिलसीला सुरू असून आज ठराव करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवतारे दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. पुण्यात शिवसेना मोठी होण्यासाठी शिवतारेंनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्यामुळे जर शिवतारे शिंदे गटात सामील झाले तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे.