शिवसेनेचे उपनेते आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मोठा धक्का दिल्याचे समोर आले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे.
पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका
शिवसेनेतून बंडखोर एकनाथ शिंदे गटाने वेगळा मार्ग धरल्याने सेनेमध्ये जोरदार हकालपट्टीचं सत्र सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अशातच पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका शिवाजीराव पाटील यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे शिवसेनेने बंडखोरांसह त्यांच्या समर्थकांना पक्षापासून लांब ठेवण्याचे सत्र सुरू केल्याचे दिसून येत आहे.
शुभेच्छा दिल्यानंतर झाली कारवाई
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ट्विट करत असे म्हटले की, गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब. तर या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नसल्याचे दिसत आहे.
Join Our WhatsApp Communityमहाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/HN4ZMzXqO8
— Shivajirao Adhalrao (@MPShivajirao) July 1, 2022