मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली असून पुढील कारवाईसाठी ही फाईल राज्याच्या गृहविभागाकडे पाठवली जाणार आहे.
परमबीर सिंह यांच्यावर बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली आहे. यासंबंधी आजच आदेश दिले आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून आधीच परमबीर सिंह यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू केली होती. आयएएस अधिकारी देबाशीष चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या तपासानंतर सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनुसार निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत मिळाले होते. यानंतर आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
प्रशासकीय त्रुटींसाठी विभागीय चौकशी
याशिवाय राज्याच्या गृह विभागाने प्रशासकीय त्रुटींसाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. यावेळी त्यांनी असे म्हटले की, “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे.”
(हेही वाचा -भारत-रशिया AK-203 करारावर स्वाक्षरी! दिल्ली दौऱ्यात पुतिन-मोदींची पहिली भेट)
न्यायालयाकडून केले फरार घोषित
परमबीर सिंग यांना गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेकदा समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबई न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. यावेळी डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी परमबीर सिंग यांची चौकशी केली होती.