अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (एनसीबी) माजी मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील मालकीच्या बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली आहे.
जाणून घ्या प्रकरण
नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक रेस्ट्रो बार आहे. या रेस्ट्रो बारचे नाव सद्गुरू असून, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे परवाना ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. मलिक म्हणाले होते की, यासाठी वानखेडेंच्या जन्म तारखेत म्हणजेच वयामध्ये बदल करण्यात आला होता. या आरोपानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर आता या बारचा परवाना रद्द केला आहे.
(हेही वाचा – मुंबईला मागे टाकत, हा जिल्हा मुलांच्या लसीकरणात अग्रेसर!)
वानखेडेंनी काय म्हटले ?
या संदर्भात वानखेडे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले होते. भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. सेवेमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजेच २००६ पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात दिला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कमाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला असल्याचेही वानखेडे यांनी म्हटले होते.
Join Our WhatsApp Community