युवा सेनेला राष्ट्रवादीचा खांदा… कोण आहे ‘हा’ नेता?

युवा सेनेच्या स्थापनेपासून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते झटत असताना त्यांना पद न देता बाहेरुन आलेल्यांचा मान राखला जात असल्याने, खुद्द युवा सैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

128

राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा खांदा घेऊन स्थापन केलेले असतानाच, आता युवा सेनेलाही राष्ट्रवादीचाच खांदा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील निवासस्थानावर मोर्चा काढून आंदोलन करणाऱ्या युवा सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली. या मोर्चात जखमी झालेल्या मोहसीन शेख याला युवा सेनेचे सहसचिव बनवले गेले. मोहसीन शेख हे मानखुर्दमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती असून, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या माजी मंत्री सचिन अहिर यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे मोहसीन शेखला सहसचिव बनवून अहिर यांनी आपल्या एका समर्थकाला युवा सेनेत फिट करत त्यांना राष्ट्रवादीचा मजबूत खांदा दिल्याचेही बोलले जात आहे.

(हेही वाचाः निवडणुका आणि लॉकडाऊनवरुन राज ठाकरेंचा सरकारवर खळबळजनक आरोप)

मोहसीन शेख झाले युवा सेना सहसचिव

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने, युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली जुहू येथे राणे यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढत युवा सेनेने आंदोलन केले. या मोर्चामध्ये युवा सैनिक आणि राणे समर्थक व भाजप कायकर्ते एकमेकांना भिडले. यामध्ये युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झाले. त्यातील मोहसीन शेख हेही जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची चौकशी करण्यासाठी वरुण सरदेसाई यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच सचिन अहिरही रुग्णालयात पोहोचले होते. त्यानंतर युवा सेनेचे प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोहसीन शेख यांची युवा सेनेच्या सहसचिवपदी घोषणा केली.

FB IMG 1630350152197

(हेही वाचाः बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावरच्या गाड्या कमी झाल्या का? राज ठाकरे कडाडले)

शिवसेनेत झाले पुनर्वसन

मोहसीन शेख हे मानखुर्दमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. महापालिका प्रभाग १४० मध्ये त्यांच्या पत्नी नादिया शेख या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मागील विधानसभा निवडणुकीत मोहसीन शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु त्यांची पत्नी नादिया शेख या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मोहसीन शेख यांना कोणतेही पद देण्यात आले नव्हते. पण केंद्रीय मंत्र्यांच्या घरावरील आंदोलनात मारहाण झालेल्या या मोहसीन शेखचे पुनर्वसन युवा सेनेत करण्यात आले आहे.

(हेही वाचाः शिवसेनेकडून आता नारायण राणेंवर कौतुकाचा ‘वर्षा’व!)

युवा सैनिक संभ्रमात

मोहसीन शेख हे माजी मंत्री सचिन अहिर यांचे समर्थक मानले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याशी त्यांचे वाद असल्याने त्यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. अहिर यांचे समर्थक असल्याने त्यांनी युवा सेनेच्या या आंदोलनात मोहसीन शेख यांच्यावर जबाबदारी सोपवल्याचे बोलले जाते. त्यामुळे वरुण सरदेसाई यांचे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याने त्यांना सहसचिव बनवल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. युवा सेनेच्या स्थापनेपासून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते झटत असताना त्यांना पद न देता बाहेरुन आलेल्यांचा मान राखला जात असल्याने, खुद्द युवा सैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे मोहसीन शेख यांचा युवा सेनेशी काहीही संबंध नसतानाही अचानक प्रकट होत ते पदही घेऊन गेल्याने युवा सैनिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(हेही पहाः मातोश्री समोरच मनसेने फोडली हंडी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.