मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि शिंदे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी 15 ते 20 मिनिटे बैठक झाली. कथित 100 कोटीच्या वसुली प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावरही आरोप आहेत. या बैठकीत 15 ते 20 मीनिटे चर्चा झाली असून नेमके कोणत्या विषयावर त्यांची ही भेट झाली हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नेमके कारण काय?
परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप केला होता. देशमुख यांना जामीन मिळाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे आता पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा: विलंबचा फटका; मेट्रो प्रकल्पांच्या मूळ खर्चात दोन हजार कोटींहून अधिक वाढ )
गेले अनेक दिवस गायब असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाची सुनावणी झाल्यावरच दिसले. यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. इतकेच नाही, तर या प्रकरणात देशमुख मागच्या 11 महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. तर या सर्व प्रकरणामध्ये परमबीर सिंह यांचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबन करण्यात आले होते. आता परमबीर सिंह पुन्हा जोरदार कमबॅक करणार अशा चर्चा सुरु झाल्या असून, त्याच अनुषंगाने ही भेट झाल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community