माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

142

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. प्रणव मुखर्जी यांचे पूत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २०१२ ते २०१७ दरम्यान ते भारताचे राष्ट्रपती होते. प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नुकतीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया देखील झाली होती. प्रणव मुखर्जी यांना  २०१९ मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खराब असल्यामुळे १० ऑगस्टला त्यांना दिल्लीच्या आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावले. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. 5 दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभावामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते.

माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

प्रणवदा यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. त्यांना भारतरत्न जाहीर झाला, तेव्हा त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेत मांडण्याची संधी मला मिळाली होती. केंद्रात अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, वाणिज्य आणि परराष्ट्र व्यवहार अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी सांभाळल्या. सुमारे 50 वर्ष विविध जबाबदार्‍यांच्या माध्यमातून त्यांनी देशाची सेवा केली. गांधी विचारधारेचे ते खंदे समर्थक आणि अनुयायी होते. अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आणि आर्थिक सुधारणांच्या ते अग्रस्थानी होते. भारतीय राजकारणातील एका महनीय नेतृत्त्वाचे असे आपल्यातून निघून जाणे, हे मनाला व्यथित करणारे आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधानसभा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.