पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश,पक्षाचेही विलीनीकरण

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपला नवा पक्ष स्थापन करणारे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोमवारी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला असून आपला पक्षही भाजपमध्ये विलीन केला आहे. अमरिंदर यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि अनेक सहकारी सुद्धा भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

पक्षाचे विलीनीकरण

गेल्या काही दिवसांपासून अमरिंदर सिंह हे आपल्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी नव्याने स्थापन केलेल्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. स्वतः अमरिंदर सिंह यांना देखील आपल्या पटियाला मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अमरिंदर सिंह हे आपल्या पंजाब लोक काँग्रेस पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करणार असल्याचे बोलले जात होते. अलिकडेच सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यामुळे या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले होते.

(हेही वाचाः ‘जर महाराष्ट्रातील वातावरण बिघडले तर त्याला राज्य सरकार जबाबदार’, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन खैरेंचा इशारा)

पंजबाच्या उज्वल भविष्यासाठी निर्णय

पंजाबचे उज्वल भविष्य पहायचे असेल तर पक्ष भाजपमध्ये विलीन करणे गरजेचे असल्याचे समर्थकांचे म्हणणे होते. त्यामुळे एकमताने हा विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमची आणि भाजपची विचारधारा एक आहे, असे या निर्णयानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर,किरेन रिजिजू पंजाब भाजप प्रमुख अश्वानी शर्मा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here