शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडल्याने एअर अॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईत हलवण्यात आले आहे. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने, त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जैन यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे लक्षात आल्यावर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आले आहे.
घरकुल घोटाळ्यामध्ये गुन्हा दाखल होऊन सुरेश जैन यांना अटक झाली होती. 29 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी जैन यांच्यासह 47 जण दोषी ठरले होते. पण दोन आठवड्यांआधीच जैन यांना नियमित जामीन मंजूर झाल्याने ते जळगावात पोहोचले होते.
( हेही वाचा: Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य )
ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु
सुरेश जैन यांना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात नियमित उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांच्यावर आता ब्रीट कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.